रहेमान नवरंगाबादी
लोणार : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेची भीषणता शहरासह ग्रामीण भागात जाणवली. अनेकांना बेड मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र हाेते. दुसरीकडे ग्रामीण भागात लाखाे रुपये खर्च करून उभारलेल्या प्राथमिक उपकेंद्राच्या चार इमारती शाेभेची वास्तू बनल्या आहेत तसेच गुंजखेड येथील आयुर्वेदिक रुग्णालयाच्या इमारतीला उद्घाटनाची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे.
सर्वसामान्यांना गावातच चांगल्या आराेग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उदात्त हेतूने प्राथमिक आराेग्य, उपकेद्रांची निर्मिती केली आहे. अनेक ठिकाणी लाखाे रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र, आराेग्य विभागाच्या नियाेजनशून्य कारभारामुळे उपकेंद्र सुरूच नसल्याने या भागातील ग्रामस्थ आराेग्य सेवेपासून वंचित राहिले आहेत. अंजनी खुर्द, वेणी, तांबोळा, देऊळगाव वायसा या गावांतील आराेग्य उपकेंद्रांच्या इमारतीचे बांधकाम लाखाे रुपये खर्च करून केलेले आहे तसेच गुंजखेड येथील आयुर्वेदिक दवाखान्याची इमारतही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या इमारतीमध्ये साहित्य व कर्मचारी भरती करून या ठिकाणी आरोग्य सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजेश मापारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दाेन वर्षांपासून उद्घाटनाची प्रतीक्षा
तांबोळा या गावी मागील दोन वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत लाखो रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, इमारतीचे उद्घाटन न झाल्याने या परिसरातील रुग्णांना लोणार शहरामध्ये हेलपाटे घेत उपचारासाठी जावे लागत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे २०१९ ला काम पूर्ण झाले आहे. परंतु, संबंधित विभागाला या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनासाठी मुहूर्त मिळाला नसल्याचे चित्र आहे.
उपकेंद्राच्या इमारतीत ठेवले लाकूड
तांबोळा येथे प्राथमिक उपकेंद्रामध्ये लाकडाच्या ठेकेदाराने येथे सागवानाची झाडे तोडून साठवणूक केली आहे. तसेच या नवीन इमारतीच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य पसरले असून, नवीन इमारतीच्या काही भागांना तडे जात आहेत. या उपकेंद्रातील सागवानचा साठा हा कोणाचा आहे तसेच या उपकेंद्राच्या इमारतीचा वापर करण्याची परवानगी कुणी दिली, असे प्रश्न उपस्थित हाेत आहेत.
तालुक्यातील या उपकेंद्रांमध्ये तत्काळ साहित्य व कर्मचाऱ्यांची भरती करून आरोग्य सेवा सुरू करा, अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी या ठिकाणी धरणे आंदोलन करून संबंधित विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल तसेच दुसऱ्या दिवशी स्वतः उपकेंद्रे सुरू करण्यात येतील.
राजेश मापारी
जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य बुलडाणा.