लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात पुन्हा अवकाली पावसाने फटका दिला असून तीन तालुक्यातील ३५ गावातील १५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने मोताला, खामगाव आणि जळगाव जामोद तालुक्यांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यातही झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर नुकसान झालेले असताना पुन्हा त्याचीच एक पुर्नरावृत्ती झाली आहे.गुरूवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात बुलडाणा जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात सरासरी ७.०९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस हा मोताळा तालुक्यात पडला असून त्याची नोंद १३.१ मिमी झाली आहे. सुदैवाने यावेळी जिल्ह्या गारपीट झालेली नाही, मात्र अवकाळी पावसाने उपरोक्त तीनही तालुक्यात गहू, मका, हरबरा, कांदा, भुईमूग व अन्य काही पिकांचे नुकसान झाले आहे. यात मोताळा तालुक्यातील १३ गावातील ३६१ हेक्टर, खामगाव तालुक्यातील १८ गावातील एक हजार १०२ हेक्टर तर जळगाव जामोद तालुक्यातील चार गावातील २१.६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात जवळपास १४८५ हेक्टरवरील पिकांचे हे नुकसान झाले आहे. बुधवारी सांयकाळी बुलडाणा शहरासह १३ ही तालुक्यात या पावसाने हजेरी लावली होती. यामध्ये बुलडाणा तालुक्यात ५.१ मिमी, चिखलीमध्ये ४.५, मेहकरमध्ये ३.५, सिंदखेड राजामध्ये ५.१, देऊळगाव राजा ०.८, लोणार सहा, खामगाव ११, शेगाव ५.८, मलकापूर, १२, मोताळा १३.१, नांदुरा ११.५, संग्रामपूर, ६.२, जळगाव जामोद ७.६ या प्रमाणे पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात काही ठिकाणी नुकसान झाले आहे.(प्रतिनिधी)