लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर(जि.बुलडाणा): नगरपालिकेने मालमत्ता व पाणीकर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे. कर न भरल्याने आतापर्यंत ३० नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे जनतेत खळबळ उडाली आहे.मार्च महिना असल्याने मालमत्ता कर व पाणी कराची वसुली नगरपालिकेने सुरू केली आहे. दरवर्षी लाखो रुपये कर वसुली मार्च महिन्यामध्ये करण्यात येते. यावर्षी सुद्धा नगरपालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. मुख्याधिकारी अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेतील सर्व कर्मचारी सकाळपासूनच शहरातील सर्व वॉर्डामध्ये फिरून कर वसुली करीत आहे. अनेकांकडे कर वसुली थकीत असल्याने कर न भरल्यास नळ कनेक्शन बंद करण्यात येत आहे. वॉर्ड क्रमांक ३, १६ व २० या वॉर्डामध्ये जवळपास ३० कनेक्शन बंद करण्यात आले आहे. या नंतर वॉर्ड क्रमांक ४, ५ व ६ या वॉर्डातील नागरिकांनी कर न भरल्यास नळ कनेक्शन बंद करण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांनी वेळेवर कर न भरल्यास त्या नगरीकांची नावे वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्याचे आवाहन केले आहे.
कर न भरल्यास सुविधा होणार बंद मेहकर शहराचा काही भाग नगरपालिकेच्या हद्दीबाहेर आहे. हद्दीबाहेर असलेल्या भागातील नागरिकांनी मालमत्ता कर व पाणी कराचा वेळेवर भरणा करावा. अन्यथा नगर पालिकेकडून सध्या ज्या सुविधा देण्यात येत आहेत, त्या सुविधा बंद करण्यात येतील, असे नगर पालिकेने कळविले आहे.