लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाने विश्रांती दिल्याने शेतीशीसंबंधीत रखडलेल्या कामांनी काहीसा वेग घेतला असून जिल्ह्यात आतापर्यंत ७३ टक्के पाऊस झाला असून १३ पैकी आठ तालुक्यात सरासरीच्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे आहे.यंदा पावसाने जिल्ह्यावर मेहेर नजर ठेवली आहे. टप्प्या टप्प्याने हा पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील पिकांची स्थिती चांगली आहे. मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे मात्र मुग व उडीद पिकाला काहीसा फटका बसला आहे. मात्र पावसाने विश्रांती दिल्यामुळे आता मुग, उडीदाच्या शेंगा वाळण्यास मदत होणार आहे.त्यातच ‘आॅक्टोबर हीट’चीही चाहूल सध्या लागली आहे. त्यामुळे तापमान कक्षा वाढत असल्याचे चित्र आहे.दुसरीकडे जिल्ह्यातील आठ तालुक्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला आहे. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात नऊ टक्के अधिक पाऊस आतापर्यंत पडला आहे. गेल्या वर्षी २७ आॅगस्ट पर्यंत जिल्ह्यात ५००.६ मिमी पाऊस पडला होता तर यावर्षी ५५४.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ७६१.६ मिमी पाऊस पडतो. त्याच्याशी तुलना करता वर्तमान स्थितीत गतवर्षीच्या तुलनेत नऊ टक्के अधिक पाऊस झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रकल्पातील जलसाठ्यातही वाढ झाली असून वर्तमान स्थितीत ९१ प्रकल्पांमध्ये ८० टक्के जलसाठा झाला आहे.
मलकापूर, बुलडाण्यात सर्वाधिक पाऊसबुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा मलकापूर तालुक्यात झाला असून येथे ९४.२० टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान बुलडाणा तालुक्यात ८१.०६ टक्के पाऊस पडला आहे. चिखली तालुक्यात ७९ टक्के, देऊळगाव राजात ७२ टक्के, सिंदखेड राजात ७९ टक्के, नांदुऱ्यामध्येही ७९ टक्के, संग्रामपूर तालुक्यात ७५ टक्के तर जळगाव जामोद तालुक्यात ७९ टक्के पाऊस पडला आहे. लोणार तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडला असून येथे वार्षिक सरासरीच्या तो अवघा ५७ टक्के आहे.