हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वाढत्या पाणी प्रदूषणामुळे निर्माण होणार्या समस्या आणि पाण्याच्या जलस्रोत बळकटीकरणाच्या दृष्टीने बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात येणार्या योजनेंतर्गत स्वच्छता अभियानात भरीव कामगिरी करणार्या बुलडाणा तालुक्यातील अजिसपूर गावाची पथदर्शी प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने निवड करण्यात आली आहे. त्या दृष्टिकोनातून पुणे येथील प्रायमुव्ह संस्थेने गावाची पाहणी करून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.गाव स्तरावर पिण्याचे शाश्वत व शुद्ध पाणी ग्रामस्थांना मिळावे, यासाठी राज्य शासनाच्यावतीने ठोस कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या योजनेसाठी पथदश्री प्रकल्प म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा तालुक्यातील अजिसपूर ग्रामपंचायतची निवड झाली आहे. या पथदश्री प्रकल्प राबविण्याच्या दृष्टिकोनातून पुणे येथील प्रायमुव्ह संस्था, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विद्यमाने २२ व २३ जानेवारीदरम्यान अजिसपूर ग्रा.पं.मध्ये पाण्याचे स्रोत, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने रांगोळीद्वारे नकाशा काढून माहिती जाणून घेण्यात आली. यावेळी प्रायमुव्ह पुणेचे अधिकारी चेतन हिरे, बाळासाहेब चव्हाण, सरपंच बाळाभाऊ जगताप, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, शाखा अभियंता मराठे, विस्तार अधिकारी कृषी सोनोने, कनिष्ठ भुजन अभियंता तठ्ठे सचिव समता पाटील यांची उपस्थिती होती. दोन दिवस चाललेल्या या प्रक्रियेत सरपंच बाळाभाऊ जगताप, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सचिव ममता पाटील यांच्यासह जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील जलनिरीक्षक शरद ठाकूर, शालेय स्वच्छता सल्लागार नवृत्ती शेडगे, स्वच्छता तज्ज्ञ वैभव ढांगे, मनुष्यबळ विकास सल्लागार मनीषा शेजव, पाणी गुणवत्ता तज्ज्ञ किरण शेजोळे, पंचायत समिती स्तरावरील समूह समन्वयक वर्षा खैरे, जया गवई हे उपस्थित होते. याबाबतच्या आराखड्यासंदर्भात २६ जानेवारी रोजी आयोजित सभेत चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.
शाश्वत कृती आराखड्यास प्राधान्यपुणे येथील प्रायमुव्ह संस्था, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकार्यांनी यावेळी गावफेरी करून गावातील स्वच्छता, पाण्याच्या सुविधा, ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर गाव नकाशा काढून सार्वजनिक पाण्याचे स्रोत आणि पिण्याच्या पाण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेसंदर्भात प्राथमिक स्तरावर ग्रामस्तरीय पिण्याच्या पाण्याचा शाश्वत कृती आराखडा तयार करण्यात आला.
शाश्वत व शुद्ध पाणी ग्रामस्थांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यासाठी अजिसपूर ग्रामस्थांनी एकजुटीने सहकार्य करावे.- षण्मुखराजन एस, सीईओ जि.प. बुलडाणा.