साखरखेर्डा (बुलडाणा) : दरेगाव येथे ३ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांनी दरोडा टाकून २९ तोळे सोने आणि ७० तोळे चांदीचे दागिने लंपास केले. दराेडेखाेरांनी केलेल्या मारहाणीत एकजण जखमी झाला आहे. या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. एसडीपीओंसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी दराेडेखाेरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरेगाव येथे गजानन सुरेश बंगाळे हे आई, पत्नी, आजी, लहान भावाची पत्नी, आणि मुले राहतात. मागील वर्षी वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले, तर भाऊ घनश्याम यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळे गजानन बंगाळे यांनी मेरा बु .रस्त्यावरील शेतात घर बांधले आहे. शेतातील घरात ३ जुलैला रात्री ११ वाजताच्या सुमारास अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांनी गजानन बंगाळे यांच्या बेडरूममध्ये प्रवेश केला. ते झोपेत असताना त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. ओरडलास तर जिवाने मारू अशी धमकी देत कानाला गावठी पिस्तूल लावली. काहींच्या हातात चाकू, गुप्ती अशी धारदार शस्त्रे होती. त्यांनी २० लाखांची मागणी केली. गजानन याने विनवणी करीत तुम्हाला हवं ते घेऊन जा, पण मारू नका! अशी गयावया केली. त्याचे हात व तोंड कपड्याने बांधून शाैचालयात कोंडले. त्यानंतर दराेडेखाेरांनी आपला मोर्चा इतर कुटुंबे असलेल्या खोलीत वळविला. त्यांनी आई, पत्नी, आजी, लहान भावाची पत्नी, मुले यांच्या अंगावरील व कपाटातील २९ तोळे सोने आणि ७० तोळे चांदी, घरातील सर्व मोबाईल असा सहा लाख १० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. बाजारभावाप्रमाणे या सर्व दागिन्यांची किंमत २० लाख रुपये होते.
माेबाईल फेकले रस्त्यावर
दराेडेखाेरांनी काही माेबाईल मेरा बु. रस्त्याने फेकून दिले. या घटनेची माहिती दरेगाव गावात पसरताच माजी सभापती गजानन बंगाळे यांनी या घटनेची माहिती साखरखेर्डा पोलीस स्टेशनला कळविली. पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे, पोलीस कर्मचारी रामदास वैराळ, राजू मापारी यासह प्रदीप सोभागे, निवृत्ती पोफळे, लक्ष्मण इनामे, राजेंद्र अंभोरे, आदींनी भेट देऊन पाहणी केली, तसेच साेमवारी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, एलपीसीचे बळिराम गीते, प्रभारी ठाणेदार अहिरे यांनी डाॅग पथकासह घटनास्थळ गाठले.