खामगाव : शहरातील बेशिस्त वाहतुकीला वळण लावण्यासाठी शहर पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले यांनी आपल्या पथकासह बस स्थानक, नगर पालिका चौकासह विविध कॉम्पलेक्स समोरील वाहनांवर कारवाई केली. या कारवाईमुळे बेशिस्त वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. खामगाव शहरातील बस स्थानक चौकासह मुख्य बाजारपेठ आणि व्यापारी गाळ्यांसमोरील बेशिस्तपणे उभी राहणारी वाहने अनेकांची डोकेदुखी बनली होती. याबाबत नागरिकांच्या तक्रारीही वाढीस लागल्या होत्या. दरम्यान, व्यापारी गाळ्या समोरील बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यासाठी तसेच शहरातील मुख्य रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यासाठी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले यांच्या नेतृत्वात विशेष धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेचाच एक भाग म्हणून शनिवारी संतोष ताले यांनी वाहतूक पोलीस आणि अतिरिक्त ताफ्यासह बस स्थानक चौक गाठले. नांदुरा रोडवरील बेशिस्तपणे उभ्या असलेल्या काळी-पिवळी, दुचाकी आणि ऑटो चालकांवर कारवाई केली. तसेच रस्त्यावर खाद्यपदार्थ तसेच फळ विक्री करणा-यांनाही यावेळी तंबी देण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे ऑटो चालक, काळी-पिवळी चालकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. तर अनेकांनी धावाधाव करत आपली वाहने बाजूला केली. काही वाहनांची हवाही सोडण्यात आली. तर काही वाहने उचलून शहर पोलीस स्टेशनला नेण्यात आली.
नियमित कारवाई व्हावी!शहरातील बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक समस्येला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने शहरातील विविध चौकात ही धडक मोहीम नियमितपणे राबविण्यात यावी, अशी मागणी या निमित्ताने होत आहे. बेशिस्त वाहतुकीला लगाम लावण्यासाठी शहर पोलिसांनी राबविलेल्या या कारवाईची अनेकांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. या कारवाईमुळे अवघ्या पाचच मिनिटात शहरातील मुख्य रस्त्यासोबतच इतरही रस्त्याचा श्वास मोकळा झाल्याचे दिसून आले.