लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येथील जिल्हा न्यायालयाच्या अतिरिक्त इमारतीचा प्रश्न मार्गी लागला असून, आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रयत्नाने बुलडाणा जिल्हा न्यायालयाच्या आवारात अतिरिक्त न्यायालयीन इमारत बांधकामासाठी ५ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.सद्यस्थितीत बुलडाणा येथील जिल्हा न्यायालयास उपलब्ध असलेल्या इमारती या मापदंडानुसार पुरेशा नाहीत. त्यामुळे न्यायालयीन कामकाज करणारी प्रशासकीय यंत्रणा, विधीज्ञ व जिल्हाभरातून येणा-या पक्षकारांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या मूलभूत स्वरूपाच्या सुविधा अपुर्या ठरतात. परिणामी, या यंत्रणेवर ताण येतो. या पार्श्वभुमीवर आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी सन २0१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कपात सूचना सादर करून बुलडाणा व मोताळा येथील न्यायालयीन इमारत, न्यायधीशांसह कर्मचार्यांसाठी शासकीय निवासस्थाने इत्यादीबाबत शासनाकडे मागणी केली होती. दरम्यान, आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रशासकीय पातळीवर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बुलडाणा जिल्हा न्यायालयाच्या आवारात अतिरिक्त न्यायालयीन इमारत बांधण्याच्या प्रस्तावास विधी व न्याय विभागाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. जिल्हा न्यायालयात शासकीय मापदंडानुसार फर्निचर, सौर ऊर्जा व्यवस्था, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वातानुकूलीत यंत्रणा, लिफ्ट व सी.सी. टी. व्ही. इत्यादी भौतिक सोई-सुविधांमध्ये भर पडणार आहे. न्यायालयाच्या अद्ययावत अतिरिक्त इमारत बांधकामासाठी ५ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला जिल्हा न्यायालय विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. आ. सपकाळ यांनी विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल न्यायालयीन वतुर्ळामध्ये समाधान व्यक्त होत आहे.
बुलडाणा न्यायालय इमारत बांधकामासाठी निधी मंजूर
By admin | Published: June 22, 2017 4:25 AM