लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गाचा वेग जिल्ह्यात वाढला असून प्रतिदिन २४ च्या सरासरीने जिल्ह्यात रुग्ण वाढत असून कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यूदरही तीन टक्क्यांवर पोहोचला आहे.जेथे मे महिन्याच्या अखेर पर्यंत अवघे ७० बाधीत रुग्ण व तीन मृत्यू होते तेथे वर्तमान स्थितीत कोरोना बाधीतांचा आकडा ७०० च्या टप्प्यात पोहोचला आहे. ४८ दिवसात ६२६ रुग्ण जिल्ह्यात वाढलेले असतानाच जुलै महिन्याच्या १८ दिवसात प्रतिदिन सरासरी २४ च्या वेगाने ४२५ रुग्ण वाढले आहे. जून महिन्याच्या अखेरच्या रुग्ण संख्येशी त्याची तुलना करता तब्बल ६१ टक्के रुग्ण हे जुलै महिन्यातील १८ दिवसात वाढल्याचे सकृत दर्शनी स्पष्ट होत आहे.यात समाधानाची बाब म्हणजे हॉटस्पॉट मलकापूर तालुक्यात कोरोनाचा डाऊनफॉल सुरू झाला. मात्र खामगाव तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. सध्या खामगाव, शेगाव, मलकापूर, देऊळगाव राजा, मेहकर या तालुक्यात प्रामुख्याने कोरोनाचे संग्रमण वाढत आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील तालुकास्तरावरील व ग्रामीण भागातील कोवीड केअर सेंटर मिळून तीन हजार ६०० बेडची सज्जता ठेवण्यात आली आहे. जुलै अखेर जिल्ह्यात ७०० रुग्ण संख्या राहतील असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला होता. मात्र तो प्रत्यक्षात १८ जुलै रोजीच वास्तवात आल्यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याचे स्पष्ट होत आहे.कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचा वेगही जिल्ह्यात ५० टक्क्यांच्या खाली आला असून तो सध्या ४६ टक्के आहे. जो की मधल्या काळात ५५ ते ६५ टक्क्यांच्या दरम्यान होता. मात्र तो आता कमी झाला आहे.औरंगाबाद कनेक्शनमुळे जिल्ह्यात वाढल्या अडचणीऔरंगाबाद जिल्ह्यातून बुलडाणा जिल्ह्यात येणार्यामुळे जिल्ह्यात अडचणी वाढत असून शहरातील एका कार्यालयातचा कार्यकारी अभियंता दर्जाचा अधिकारीही पॉझिटिव्ह आल्यामुळे या कार्यालयातील १४ जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे. सोबतच त्याच्या वाहनावरील चालकासह त्याच्या गावातील ११ नातेवाईकांनाही क्वारंटीन होण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे मध्यवस्तीत असलेल्या सर्क्युलर रोड लगतच्या एका अपार्टमेंटमधील व्यक्ती औरंगाबादवरून परत येताच तो व त्याची पत्नी पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे अपार्टमेंटचा परिसर सील करण्यात आला आहे. दुसरीकडे या इमारतीमध्ये आरोग्य विभागातील एक अधिकारी राहत असून त्याच्यावरही क्वारंटीन होण्याची वेळ आली आहे. दरम्यान, तपासणीत निगेटीव्ह ऐवजी पॉझिटिव्ह अहवाल आल्यास आरोग्य विभागातही प्रसंगी मोठी खळबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तुर्तास तरी या शक्यता आहेत.
मलकापूर तालुक्यात सर्वाधिक मृत्यूजिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू हे एकट्या मलकापूर तालुक्यात झाले असून आतापर्यंत येथे आठ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. खामगाव तालुक्यात चार, चिखली तालुक्यात दोन तर बुलडाणा, जळगाव जामोद, शेगाव, मेहकर, मोताळा तालुक्यात प्रत्येकी एका बाधीताचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जळगाव खान्देश जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील एका महिलेचाही बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मृत्यू परीक्षण समितीने कोवीडमुळे या रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. दर १५ दिवसांनी यासंदर्भात समितीची बैठक होत असते.