लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी आनंदाची बातमी दिली खरी, परंतु पुढील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संभ्रमावस्था आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ३९ हजार ६५८ विद्यार्थी परीक्षा न देता पास झाले आहेत. या निर्णयाबाबत पालकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.कोरोनामुळे गत दोन वर्षांपासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षादेखील रद्द केल्या. याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय १९ एप्रिल रोजी जाहीर केला. जिल्ह्यात एकूण ३९६५८ विद्यार्थी दहावीचे आहेत. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने जिल्ह्यातील सरसकट ३९६५८ विद्यार्थी पास झाले आहेत. मात्र, गुणदान कसे करणार, पुढच्या वर्गात प्रवेश कशाच्या आधारावर मिळणार, आयटीआय, पॉलिटेक्निक या शाखांना प्रवेश देताना नेमकी काय पद्धती राहणार, आदी बाब अद्याप अस्पष्ट असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात आले. आता परीक्षाच रद्द झाल्याने दहावीचे सर्व विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात गेले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात दहावीचे ३९, ६५८ विद्यार्थी परीक्षा न देता पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:15 PM