- नीलेश जोशीबुलडाणा: पश्चिम वºहाडात बुलडाणा जिल्हा कोरोना संसर्गाचे इपीक सेंटर ठरत असतानाच जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत १.८३ टक्के लोकसंख्या कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळलेल्या हायरिस्क झोनमध्ये राहत आहे. त्यामुळे जिल्ह्याची एकंदरीत गंभीर स्थिती पाहता क्लस्टर कंटेनमेंट प्लॅन गंभीरतेने अंमलबजावणी करून कम्युनीटी स्प्रेडचा (समूह संक्रमण) धोका टाळण्यासाठी संपूर्ण यंत्रणेची ताकद झोकून देणार आहोत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.दरम्यान, बुलडाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची वाढती लोकसंख्या पाहता आता बुलडाण्यातच आता रॅपीड टेस्टची सुविध अल्पावधीतच उपलब्ध होणार आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून त्याबाबत सकारात्मक निर्णय समोर आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, बुलडाणा, खामगाव आणि शेगाव या सहा तालुक्यात कोरोना बाधीत दहा रुग्ण आढळले असून बुलडाण्यातील एकाचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे या तालुक्यातील संबंधीत रुग्णांच्या घराला केंद्र बिंदून मानून तयार करण्यात आलेल्या हायरिस्क झोनमध्ये तब्बल ५१ हजार २५३ लोकसंख्या राहते. या संपूर्ण लोकसंख्येची आरोग्य तपासणी करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या असून यंत्रणांनी त्यास प्रारंभ केला आहे. सोबतच बुलडाणा जिल्ह्यात लॉकडाऊन अर्थात संचारबंदीचीही १०० टक्के अंमलबजावणी होईल याबाबत निर्देश दिले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी होईल, या दृष्टीने आपण गंभीरतेने प्रयत्न करत असून यंत्रणेला तशा सुचनाही दिल्या असल्याचे ते म्हणाले.
१२ व्हेंटीलेटर मिळणारजिल्हा मुख्यालयाच्या सामान्य रुग्णालयात अवघे एकच व्हेंटीलेटर आहे. ही गंभीर बाब आपण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे लवकरच बुलडाणा मुख्यालयाच्या ठिकाणी १० ते १२ व्हेंटीलेटर उपलब्ध करण्यात येतील. सोबतच जिल्ह्यात समुह संक्रमणाचा निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी वॉर्ड निहाय नियोजन करण्यात आले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना यंत्रणेला दिल्या आहेत, असेही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले आहे.