- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मिनी लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदी, जिल्ह्यातील आठवडी बाजार स्थगित केल्यानंतरही बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वेगाने होत असून, गेल्या २६ दिवसांत तब्बल ९,२९२ जण कोरोना संक्रमित झाले असून, ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनास आता कोरोना संक्रमण रोखण्यासाठी अधिक गंभीरतेने उपाय योजण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या एक वर्षात कारोनाबाधित आढळून आलेल्यांपैकी तब्बल ३९ टक्के व्यक्ती गेल्या २६ दिवसांत संक्रमित झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर आता याची गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात २० हजारांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसही दिली गेली आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कस, ज्येष्ठ नागरिक, पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. त्या उपरही जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा आलेख हा सातत्याने वाढत आहे. परिणामी प्रशासकीय पातळीवर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कितपत वस्तुनिष्ठ होते हा कळीचा मुद्दा बनला आहे.गेल्या १४ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढल्या आहेत. जसजशा चाचण्या वाढत आहेत तसतसा कोरोना संक्रमणाचा आकडाही फुगत आहे. परिणामी कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेले निर्बंध अधिक कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा जिल्ह्यात समूह संक्रमणाचा धोका नाकारता येत नाही. गेल्या २६ दिवसांत मृत्यू पावलेले ३८ जण हे ६० पेक्षा अधिक वयाचे आहेत. यातील बहुतांश व्यक्ती या दुर्धर आजाराने ग्रस्त होत्या, असे डेथ ऑडिट समितीमधील एका सदस्याने सांगितले. त्यामुळे दुर्धर आजार असणाऱ्यांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे एकंदरीत आकडेवारी सांगते, तसेच आतापर्यंत जिल्ह्यात मृत्यू पावलेल्या २१५ जणांमधील अपवाद वगळता सर्वच जण हे दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे समोर येत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २४ हजार १०७ झाला आहे. त्यापैकी ९ हजार २९२ बाधित हे या २६ दिवसांतील आहेत. म्हणजेच आजपर्यंत सापडलेल्या एकूण बाधितांपैकी ३९ टक्के बाधित हे या २६ दिवसांत सापडले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात २६ दिवसांत ९२९२ जण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 11:30 AM