- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या सातही तालक्यातील विद्यार्थ्यांना दुष्काळाचा निकष पाहता उन्हाळी सुट्टीमध्ये शालेय पोषण आहार पुरविण्यात येणार आहे. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत दुष्काळी भागातील पहिली ते आठवीपर्यंतच्या ९७१ शाळांमध्ये उन्हाळी सुट्टीत १ लाख ४१ हजार ४११ विद्यार्थ्यांसाठी खिचडी शिवविण्यात येणार आहे. पर्जन्यमान कमी जास्त होऊन खरीप हंगामात शेतकºयांची उत्पादन परिस्थिती कशी राहिली यावरून, आणेवारी काढण्यात येते. ज्या तालुक्यात ५० पैशा पेक्षा कमी आणेवारी आल्यास त्या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये घाटाखाली जळगाव जामोद, खामगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा, संग्रामपूर व शेगाव या तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना सुटीच्या कालावधीतही शालेय पोषण आहार देण्याचे निर्देश शिक्षण विभागातर्फे देण्यात आले आहेत. केंद्र शासन पुरस्कृत असलेल्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत दुष्काळी परिस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देणे बंधनकारक आहे. त्यानुसार महसूल विभागाने जाहीर केलेल्या जिल्ह्यातील दुष्काळी सात तालुक्यातील ९७१ शाळांमध्ये उन्हाळी सुटीत शालेय पोषण आहार पुरविला जाणार आहे. त्यामध्ये पहिली ते पाचविपर्यंत ९२२ शाळांमधील ८६ हजार ९०८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या ४७४ शाळांमधील ५४ हजार ५०३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावरील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण १ लाख ४१ हजार ४११ विद्यार्थ्यांना या पोषण आहाराचा लाभ मिळणार आहे.
शनिवार, रविवारीही पोषण आहार शनिवार व रविवारला शासकीय सुट्टी राहत असल्याने अनेकांमध्ये या दिवशी पोषण आहार मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण होतो. परंतू, दुष्काळी परिस्थिती पाहता शनिवार व रविवारीही पोषण आहार वाटपासाठी सुट्टी न देताना विद्यार्थ्यांना दररोज शालेय पोषण आहार पुरविण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.