लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कपाशीवरील बोंडअळीमुळे त्रस्त झालेल्या शेतकर्यांना आता तुरीवर पडत असलेल्या किडींमुळे पुन्हा दुसरा धक्का बसत आहे. जिल्ह्यात तुरीवर आता शेंगा पोखरणार्या अळय़ांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तूर उत्पादक शेतकरी त्रस्त आहे. गतवर्षी तुरीचे जादा उत्पादन तर यावर्षी शेंगा पोखरणार्या अळीमुळे उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात ७८ हजार १४९ हेक्टर तूर पिकाचे सरासरी क्षेत्र असताना त्यात यावर्षी वाढ झालेली आहे. ८४ हजार ९८0 हेक्टर क्षेत्रावर तूर पीक असून, सध्या शेंगा पक्वतेचा टप्पा तुरीने पार केला आहे. तर काही ठिकाणी तुरीच्या शेंगा वाळतही आहेत; मात्र सध्या तूर पिकावर शेंगा पोखरणार्या किडींचा प्रादुर्भाव जाणवत आहे. शेंगा पोखरणार्या किडीची मादी सरासरी ६00 ते ८00 अंडी तुरीची कोवळी पाने, देठ अथवा कळ्या, फुले तसेच शेंगांवर वेगवेगळी घालतात. अंडी अवस्था तीन ते चार दिवसांची असते. अंडीतून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातीस सुस्त असून, कोवळी पाने व देठ कुरतडून खातात. सध्या ढगाळ वातावरण राहत असल्याने या किडींचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात आढळत आहे. पिसारी पतंग नाजूक निमुळता १२.५ मि.मी. लांब करड्या, भुर्या रंगाचा असतो. पुढील पंख दुभंगलेले व मागील पंख तीन भागात विभागलेले असतात. अंड्यातून बाहेर पडलेली अळी कळ्या, फुले व शेंगांना छिद्रे पाडून खाते. पूर्ण वाढ झालेली अळी प्रथम शेंगेचा पृष्ठभाग खरडून खाते व नंतर शेंगेला शेंगेच्या बाहेर राहून खाते. शेंगमाशीच्या प्रादुर्भावाने शेंगेवर कोणतेही लक्षण दिसत नाही; मात्र जेव्हा पूर्ण वाढलेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते. छिद्रातून माशी बाहेर पडते, तेव्हा नुकसानीचा प्रकार आढळून येतो. सध्या या अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. कपाशीपठोपाठ तुरीवर किडींनी हल्ला केल्याने तूर उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाला आहे.
असे करा व्यवस्थापनतृणधान्य व तेलबिया पिकाबरोबर पिकाची फेरपालट करावी. हेक्टरी १0 कामगंध व २0 पक्षी थांबे पिकात उभारावीत. शेंगा पोखरणार्या अळीच्या नियंत्रणाकरिता ५ टक्के निंबोळी अर्क फवारावा. तसेच या किडीच्या नियंत्रणाकरिता आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास अझाडिरेक्टिन ३00 पीपीएम ५0 मि.ली किंवा क्लोरानट्रनिलीप्रोल १८.५ एस.सी ३ मिली इमामेक्टिन बेंझोएट ५ एसजी ४.४ ग्रॅम किंवा इथिऑन ५0 ईसी २0 मि.ली किंवा फ्लुबेंडामाइड ३९.३५ एससी २ मिली प्रति १0 लीटर पाण्यात मिसळून यापैकी एक घटकाची फवारणी करावी, अशी माहिती कृषी अधिकार्यांनी दिली आहे.