नीलेश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : एका महिन्यापासून बेकायदेशीर गर्भपाताची तीन प्रकरणे जिल्ह्यात उघड झाली असून, यापैकी दोन प्रकरणांमध्ये थेट पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला असलेल्या राज्यापर्यंत धागेदोरे जात असल्याने बेकायदेशीर गर्भपाताचे बुलडाणा जिल्हा केंद्र तर ठरत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजूर आणि रोहिणखेड प्रकरणात एमटीपी कीट पुरवणारा पिंटू विश्वास हा एकमेव दुवा पुन्हा समोर आला आहे. आता या प्रकरणांच्या तपासात पोलीस प्रशासनाकडूनही गोपनियता पाळण्यात येत असून, परराज्यात त्याचे धागेदोरे पोहोचण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.लोणार येथे डॉ. सुभाष पुरोहित यांच्या रुग्णालयात बेकायदेशीर गर्भपात करताना अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली होती तर जिल्हा शल्यचिकित्सक सरीता पाटील यांनी थेट लोणार गाठून रात्रभर कारवाई करीत २0 नोव्हेंबरला संबंधित रुग्णालयाला सील ठोकले होते. या प्रकरणात मृत मुलीचे आई-वडील आणि डॉक्टरला अटक करण्यात आली होती. हे प्रकरण शांत होते न होते तोच मोताळा तालुक्यात रोहिणेड येथे क्षीरसागर हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर एमटीपी कीट जप्त करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात डॉ. संदीप क्षीरसागरसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील पिंटू विश्वास हा आरोपी पश्चिम बंगालमधील असून, तो सध्या फरार आहे. या प्रकरणात न्यायालयाने डॉ. संदीप क्षीरसागरचा जामीनही फेटाळला आहे. मोताळा तालुक्यातीलच राजूर येथे उघडकीस आलेल्या अन्य एका प्रकरणातही एमटीपी कीट पिंटू विश्वासनेच पुरवल्याची माहिती पोलीस तपासात ब्रिजलाल सुपडा (५0) याने दिली आहे. त्यावरून पोलिसांचा तपास सध्या फिरत असून, राजूर येथील प्रकरणात गर्भपात करण्यात आलेली महिला ही बीड जिल्ह्यातील होती. बेकायदेशीर गर्भपात करताना तिच्या जीवित्वास धोकाही निर्माण झाला होता. त्यामुळे तिला थेट बुलडाणा आणि नंतर तेथून अकोला येथील आयकॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाचे बिंग फुटले होते. सध्या ही महिला व तिचा पतीही अटक असून, २६ डिसेंबर रोजी त्यांची पोलीस कोठडी संपत आहे. दुसरीकडे पिंटू विश्वासच्या शोधात पोलिसांचे पथक असून, तशा हालचाली सुरू आहे.
गर्भलिंग निदान केले कोठे?राजूर येथील प्रकरणामध्ये गर्भलिंग निदान नेमके केले कोठे? हा कळीचा मुद्दा असून, महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला असलेल्या राज्यात ते गेले असावे, असा कयास पोलिसांचा आहे; मात्र त्याबाबत अधिकृत स्तरावर पोलीस बोलण्यास तयार नाही. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील किनगाव येथील महिला थेट बुलडाणा जिल्ह्यातील राजूर येथे वैद्यकीय अहर्ता नसलेल्या व्यक्तीकडे गर्भपातासाठी येते. हा संपर्क कसा झाला? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात सध्या बोराखेडी पोलीस गुंतले आहे. त्या दृष्टीने प्रसंगी परराज्यातही बोराखेडी पोलिसांचे पथक रवाना होण्याची शक्यता आहे.
सीमावर्ती तालुक्यात प्रकार उघडकीसगेल्या महिन्यात उघडकीस आलेली तीनही प्रकरणे ही जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात उघडकीस आली आहेत. लोणार, मोताळा तालुके त्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेच्या रडारवर आहे. रोहिणखेड येथील प्रकरणात तर क्षीरसागर हॉस्पिटलसह लगतच्या एका दुकानाची झडती घेण्यात आली असता त्यात गर्भपाताशी संबंधित ३३ किट आढळून आल्या होत्या. त्यावरून या प्रकरणाची गंभिरता समोर यावी.
राजूर आणि रोहिणखेड प्रकरणामध्ये एमटीपी किट पुरवण्यामध्ये पश्चिम बंगालमधील पिंटू विश्वास दुवा असल्याचे आरोपी सांगत आहे. त्यामुळे प्रकरणाचे धागेदोरे हे परराज्यापर्यंत पोहोचत आहे. त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू असून अद्याप पथक पाठविण्याबाबत हालचाल नाही.- अविनाश भांबरे, पोलीस निरीक्षक, बोराखेडी-