लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : फेब्रुवारी महिन्यापासून बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तब्बल १० टक्क्यांनी घसरलेले कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८५ टक्क्यांवर स्थिरावले आहे.गेल्या २८ दिवसात जिल्ह्यात कोराेनाचे १० हजार रुग्ण सापडले असून, गेल्या एक वर्षाचा विचार करता तब्बल ४० टक्के रुग्ण हे गेल्या २८ दिवसात सापडल्याने कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात झपाट्याने होत असल्याचे चित्र आहे. परिणामी कोविड केअर सेंटर आणि कोविड समर्पित रुग्णालयात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे डिसेंबरअखेर जिल्ह्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर पोहोचले होते ते झपाट्याने घसरले होते. त्यामुळे चिंता निर्माण झाली होती. मात्र, आता कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले नसले तरी ते ८५ टक्क्यांवर स्थिरावल्याचे चित्र आहे. हा जिल्ह्यासाठी मोठा दिलासा म्हणावा लागले. मात्र, या २८ दिवसात जिल्ह्यात तब्बल ४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने काहीशी चिंता निर्माण झाली आहे. मृत्यू पावलेल्या बहुतांश जणांना दुर्धर आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात गेल्या एक वर्षाच्या काळात १ लाख ९२ हजार ५८८ संदिग्धांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये आरटीपीसीआरद्वारे १ लाख ३२ हजार १४८, अँटिजेनद्वारे ९,५७७ आणि रॅपिड टेस्टद्वारे ५२ हजार ७९१ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी १३ टक्के अर्थात २५ हजार १३० जण आतार्पंत कोरोना बाधित आढळून आले आहेत. मात्र, दिवसेंदिवस कोराेना बाधितांचे प्रमाण जिल्ह्यात वाढत असून, १४ मार्च रोजीचा बुलडाणा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा तब्बल ३४ टक्के आहे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.
बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 11:55 AM