लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ९४ हजार ५३६ हेक्टरवर झालेल्या शेत पीकांच्या नुकसानापोटी बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४७ कोटी ८९ लाख २८ हजार रुपयांची मदत देण्यात आली असून तहसिलस्तरावर ती वाटपही करण्यात आली आहे. परिणामी दिपोत्सवाच्या ताेंडावर बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ३२ हजार ८४७.८५ हेक्टरवरील तर सप्टेंबर महिन्यात ६१ हजार ६८९.२४ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये पैनगंगा नदीसह अन्य नदी काठच्या भागातील शेतकऱ्यांची शेत जमीनही खरडून गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जून ते ऑगस्ट महिन्यात ७९ हजार ६५५ शेतकरी तर सप्टेंबर महिन्यात ६४ हजार ७१० शेतकरी असे मिळून १ लाख ४४ हजार ३६५ शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पिकाचे नुकसान झाले होते. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानाचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यात आला होता. प्रकरणी राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानापोटी सविस्तर आढावा घेण्यात येवून २३ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना नुकसानापोटी मदत देण्यास मान्यता देण्यात आली. जून ते ऑक्टोबर २०२० याकालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले अशा बाधीत शेतकऱ्यांना शेती पिकांच्या जिरायती व आश्वासीत सिंचनाखाली असलेल्या पिकांच्या नुकसानासाठी दहा हजार रुपये रुपये पर्ती हेक्टर व बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रती हेक्टर या दराने दोन हेक्टर मर्यादेत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.राज्य शासनाच्या १३ मे २०१५ च्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच वाढीव दरानुसार होणारा खर्च राज्य शासनाच्या निधूमधून खर्च करण्यास मान्यता देण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येत आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करून हा निधी शेतकऱ्यांना वाटप करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.
पीक नुकसानापोटी बुलडाणा जिल्ह्याला मिळाली ४८ कोटींची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 11:58 AM