लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना बाधीत रुग्ण सापडण्याचे प्रमाण सप्टेंबरच्या तुलनेत २० टक्क्यांनी घटले असून २६.८१ टक्क्यांवरून ते अवघे सात टक्क्यावर आले आहे. त्यातच जिल्ह्यात कोरानाच्या चाचण्यांचा वेग वाढल्यामुळे रुग्णवाढीचा हा वेग मंदावत असल्याचे चित्र आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाला होता हे विशेष.त्यामुळे कोरोना बाधीत रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे अलिकडील काळातील स्थिती पाहता निच्चांकी पातळीकडे सरकत असल्याचे चित्र आहे. एकट्या ऑक्टोबर महिन्यात १४ हजार ४०६ संदिग्धांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ३,८६३ जण कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले होते तर बाधीतांपैकी ४० जणांचा मृत्यू झाला होता. ३,६४९ बाधीतांनी कोरोनावर मात केली होती. ऑक्टोबर महिन्यात ३१ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता तर तपासण्यात आलेल्या १५ हजार ८२७ संदिग्धांपैकी २,१८४ जण कोरोना बाधीत आढळून आले होते. सोबतच २,६३३ जणांनी कोरोनावर मात केली होती.दुसरीकडे या दोन महिन्याचा विचार करता नोव्हेंबरमध्ये कोराना चाचण्यांचा वेग वाढला असून नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या नऊ दिवसातच ६,८०० संदिग्धांच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ४८३ जण कोरोना बाधीत आढळून आले तर ५६४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
मृत्युदरात घटसप्टेंबरमध्ये १.०३ टक्के कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण १.४१ टक्क्यांवर पोहोचले होते तर नोव्हेंबर महिन्यात सध्या कोराना बाधीतांचा मृत्यूदर हा ०.९० टक्क्यांवर आहे. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्ण मृत्यू पावण्याचे प्रमाणही सप्टेंबरच्या तुलनेत घटल्याचे सकृत दर्शनी स्पष्ट होत आहे. गेल्या आठ महिन्याचा विचार करता सध्या जिल्ह्याचा कोरोना बाधीतांचा मृत्युदर हा १.३१ टक्क्यांवर स्थिर आहे.