लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये लसीकरण महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या उपलब्धतेनुसार केंद्रांवर लसीकरण होत आहे. कोरोना लसीकरणासाठी दोन्ही लसी परिणामकारक आहे. कोविशिल्ड ही लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने ॲस्ट्रोझेनेका या औषध कंपनीच्या साहाय्याने विकसित केली आहे. लसीपासून भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली आहे. याशिवाय कोव्हॅक्सिन ही लस भारतीय बनावटीची आहे. ती हैदराबादच्या भारत बायोटेक या कंपनीद्वारे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून पाच टप्प्यात नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.
कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड ह्या दोन्ही लसी परिणामकारक आहेत. दोन्ही लसी भारतीय आहेत. त्यामुळे कोणत्या लसीला पसंती द्यायची हे सोडून मिळेल ती लस घेणे महत्त्वाचे आहे. कोविशिल्डचा पुरवठा जास्त असल्याने बहुतांश केंद्रांंवर ही लस आहे. त्याच्या तुलनेत कोव्हॅक्सिनचा पुरवठा कमी आहे. -डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.