बुलडाणा : जिल्ह्यात ४३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून २४ डिसेंबरला प्रचार तोफा थंडावल्या. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ४३ सरपंच पदासाठी १७३ उमेदवार व ४०५ सदस्य पदासाठी ७६६ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. सरपंच व सदस्य पदाच्या एकूण ९३९ उमेदवारांसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.बुलडाणा जिल्ह्यात जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१८ या दोन महिन्यात मुदती संपणा-या ४३ ग्रामपंचायतींची दुस-या टप्प्यातील निवडणूक २६ डिसेंबर रोजी होत आहे. सरपंच पद थेट जनतेतून निवडायचे असल्याने या निवडणूका ख-या अर्थाने सरपंच पदाभोवतीच केंद्रीत झाल्या आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया ५ डिसेंबर पासून सुरू झाली होती. ग्रामपंचायतच्या ४३ सरपंच पदासाठी छाननीअंती एकूण २६९ नामनिर्देशन दाखल होते. यापैकी ९६ उमेवारांनी माघार घेतल्याने सरपंच पदासाठी एकूण १७३ उमेदवार रिंगणार आहेत. तर ४३ ग्रामपंचायतमध्ये ४०५ सदस्यपदासाठी छाननीअंती एकूण ९६४ नामनिर्देशन दाखल होते. यामध्ये १९८ उमेदवारांनी माघार घेतल्याने सदस्यपदासाठी ७६६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ४३ ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्य पदासाठी ९३९ उमेदवारांकरिता मंगळवारला मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ग्रामपंचायत निवडणुक प्रचाराला १५ डिसेंबरपासून सुरूवात झाली होती. दरम्यान, २४ डिसेंबरला प्रचार बंद झाला असून, प्रशासनही मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे.
मतदान क्षेत्रातील बाजारावर बंदीमतदानाच्यादिवशी मतदारांना मतदान करता यावे तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन २६ डिसेंबर मंगळवार व २७ डिसेंबर बुधवारला मतमोजणीच्या दिवशी ग्रामपंचायत मतदान क्षेत्रात भरणारा बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. मतदान व मतमोजणीच्या दिवशी मतदान क्षेत्रात बाजार न भरविता त्यापुढील दिवशी गुरुवार २८ डिसेंबर रोजी बाजार भरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हादंडाधिकाºयांनी दिली आहे.
२७ डिसेंबरला मतमोजणी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. तसेच २७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मतमोजणी जाहीर करण्यात येणार आहे. बुलडाणा तालुक्यासाठी मतमोजणीचे ठिकाण तहसिल कार्यालय बुलडाणा, चिखली तालुक्यासाठी तालुका क्रिडा संकुल बॅड मिंटन हॉल, सिंदखेडराजा तालुक्यासाठी नगर पालीका टाऊन हॉल, देऊळगाव राजा तालुक्यासाठी तहसिल कार्यालय, मेहकर तालुक्यासाठी तहसिल कार्यालय, लोणार तालुक्यासाठी तहसिल कार्यालय, खामगाव तालुक्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह तहसिल कार्यालय, शेगाव तालुक्यासाठी पंचायत समिती सभागृह, मलकापूर तालुक्यासाठी प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय, मोताळा तालुक्यासाठी तहसिल कार्यालय, जळगाव जामोद तालुक्यासाठी तहसिल कार्यालय येथे होणार आहे.