लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या वर्षी करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय घोषणेनुसार बुलडाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास ८ रुग्णवाहिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच या आठही रुग्णवाहिका जिल्ह्यास प्राप्त होणार आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकांची कमी असलेली संख्या पाहता, निर्माण होणाऱ्या समस्येचे निराकरण करण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आरोग्य संस्थांच्या जुन्या रुग्णवाहिका बदलून नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्याची घोषणा केली होती. मात्र, आर्थिक वर्ष संपताना अनुषंगिक प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे बीडीएसवर प्राप्त असलेले अनुदान संक्षिप्त देयकावर काढण्याबाबत परवानी मिळविण्यात आली होती. त्यानुषंगाने आरोग्यसेवा आयुक्तालय स्तरावरून राज्यातील २४३ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८ रुग्णवाहिका या बुलडाणा जिल्ह्यास मिळणार असून, अल्पावधीतच त्या जिल्ह्यास प्राप्त होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. बुलडाणा जिल्ह्यासाठी आरोग्य विभागाने ४८ रुग्णवाहिकांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यात फक्त ८ रुग्णवाहिका मिळत आहेत. म्हणजेत एकूण मागणीच्या १६ टक्केच रुग्णवाहिका जिल्ह्याला उपलब्ध होत आहेत. गेल्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५०० रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी ८९ कोटी ४८ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली होती.
बुलडाणा जिल्ह्यास मिळणार आठ रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 12:00 PM