- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जून महिन्यात वार्षिक सरासरीच्या ६ टक्के पावसाची तूट जिल्ह्यात असतानाच जुलै महिन्यातही सरासरी १७० मिमी ते २०० मिमी दरम्यानच पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मर्यादीत स्वरुपातच पाऊस पडणार असल्याचे संकेत आहे.हवामानाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या देशातील १९६ जिल्ह्यांमध्ये बुलडाण्याचा समावेश आहे. त्यामुळे जवळपास ३० टक्के क्षेत्रावरील रखडलेल्या पेरण्या, पिकांचे जीवन चक्र, प्रकल्पातील जलसाठा पाहता कमी दिवसात येणाऱ्या वाणांना शेतकऱ्यांनी पसंती देण्याची गरज असल्याचे मत जिल्हा कृषी हवामान केंद्राचे आहे.दरम्यान, नवी दिल्ली येथील भारतीय हवामान विभागाने जुलै पासून दर महिन्याचा पावसाचा अंदाज देण्यास प्रारंभ केला आहे. त्यानुषंगाने १ जुलै रोजी प्राप्त झालेल्या अंदाजानुसार बुलडाणा जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरी १८० ते २०० मिमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थात जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरी १८९ मिमीच्या आसपास पाऊस पडतो. त्यामुळे जुलै महिन्यात जिल्ह्यात भरपूर पाऊस पडले असा जनसामान्यांचा अंदाज असला तरी प्रत्यक्षात सरासरी ऐवढाच पाऊस पडण्याची शक्यता नवी दिल्ली येथील भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली असल्याचे जिल्हा कृषी हवामान केंद्रातील हवामान तज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी दिवसात येणाऱ्या वाणाला शक्यतो पेरणीसाठी पसंती द्यावी असेही त्यांनी साप्ताहिक कृषी सल्ल्यामध्ये सांगितले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात जुलैमध्येही सरासरीच पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 11:32 AM