ब्रम्हानंद जाधव।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. दोन दिवसामध्ये नुकसानाचे सर्वे पूर्ण होत आहेत. या नुकसानाचा आकडा गुलदस्त्यात आहे. परतीच्या पावसाने यंदा खरीप पीकच पाण्यात गेल्याने शेतकरी संकटात आहेत. मूग, उडीद काढणीच्या वेळी झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. काही शेतातील मूग वेचणीच्या कामी पडला नाही. त्यानंतर ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी पुन्हा परतीच्या पावसाचा तडाखा बसला. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने अनेक शेतातील सोयाबीन पिकाला कोंब आले. त्यामुळे शेतकऱ्यांना हिरवी कच्च असलेली सोयाबीन कापूण शेतातच वाळवत ठेवावी लागली. दरम्यान, पावसाने १५ दिवसाची विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणीला सुरूवात केली. सोयाबीन साेंगणीचा हंगाम जोरात सुरू असताना परतीच्या पावसाचा तडाखा जिल्ह्यात बसला. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोंगूण टाकलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या सुड्या लावल्या होत्या; परंतू त्यावर पाऊस झाल्याने सोंगलेल्या सोयाबीनचेही नुकसान झाले आहे. सोयाबीन ओली झाल्याने आता मळणीयंत्रातूनही काढता येत नाही. कपाशी पीकही वेचणी करण्यास अडचणी येत आहेत. पांढरा शुभ्र मिळणारा कापूस झाडावरच काळा पडला आहे. या नुकसानाचे सर्वेक्षण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. आणखी दोन दिवस हे सर्वे चालणार आहेत. परंतू अद्यापही काही भागात महसूल विभाग पोहचला नसल्याचे दिसून येते.
दोन दिवसात येणार पीक नुकसानाचा अहवालजिल्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी यासह इतर काही पिकांचे नुकसान झाले आहे. या पीक नुकसानाचे पंचनामे सध्या सुरू आहेत. प्रत्यक्ष शेतात जाऊन हे पंचनामे करण्यात येत आहेत. आणखी दोन दिवसामध्ये नुकसानाचे पंचनामे पूर्ण होतील. त्यानंतरच पीक नुकसानाचा अहवाल येईल. जिल्हा परिषद, महसूल व कृषी विभाग संयुक्तपणे हे पंचनामे करत आहे. -नरेंद्र नाईक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा.