लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जिल्ह्यातील विविध कर्णबधिर विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी कर्णबधिरांचे बेरा टेस्ट प्रमाण पत्र आवश्यक आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांकडून ही तपासणी करण्यात येते; परंतु जिल्ह्यात ही सुविधाच उपलब्ध नाही. त्यामुळे कर्णबधिरांच्या शाळा प्रवेशात अडचणी निर्माण होत असून, पालकांना मुंबई, औरंगाबाद येथे हेलपाटे घ्यावे लागत आहेत.जिल्ह्यात खामगाव, मलकापूर, बुलडाणा, लोणार, हिवरा आश्रम, देऊळगाव मही व चांडोळअशा ७ ठिकाणी कर्णबधिर विद्यालये आहेत. या विद्यालयांमध्ये कर्णबधिर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जा तो; मात्र प्रवेशाकरिता या विद्यार्थ्यांचे बेरा टेस्ट प्रमाणपत्र आवश्यक असते. जिल्हा शल्य चिकित्सक कर्णबधिर मुलांची तपासणी करून त्यांना हे प्रमाणपत्र देतात; परंतु सदर तपासणीसाठी लागणारी साधनसामग्री जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे बुलडाण्यात ही तपासणी होऊ शकत नसल्याने पालकांची अडचण होत आहे. अकोला येथे ही तपासणी करण्याची सुविधा खासगी रुग्णालयात उपलब्ध आहे; परंतु तेथील तपासणीचे प्रमाणपत्र शाळा प्रवेशाकरिता ग्राह्य धरले जात नाही. त्यामुळे कर्णबधिर मुलांच्या पालकांना मुंबई, पुणे किंवा औरंगाबाद येथे सदर तपासणी करण्यासाठी जावे लागते. यामध्ये त्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन सदर तपासणीची सुविधा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कर्णबधिर मुलांच्या पालकांकडून होत आहे.खामगावात नाही नाक,कान,घसा तज्ज्ञयेथील सामान्य रुग्णालयास जिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झालेला आहे; पण याठिकाणी नाक,कान,घसा तज्ज्ञ उपलब्ध नाहीत, त्यामुळे लहान-सहान तपासण्यांसाठी अकोला येथे धाव घ्यावी लागते. आरोग्याच्या बाबतीत सुविधांचा अभाव रुग्णांसह कर्णबधिरांसाठी त्रासदायक ठरत आहे.
कर्णबधिरांच्या बेरा टेस्टची बुलडाणा जिल्ह्यात सुविधाच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 9:02 PM
बुलडाणा जिल्ह्यात ७ ठिकाणी कर्णबधिर विद्यालये.
ठळक मुद्देमुंबई, औरंगाबादला घ्यावे लागतात हेलपाटे शाळा प्रवेशात अडचण