- नीलेश जोशी
बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या समाधानकारक पावसाने वार्षिक सरासरीची पन्नाशी ओलांडली असतानाच कृषी विभागाने खरीपातील उत्पादकतेचा पहिला अनुमान काढला असून यंदा जिल्ह्यात धान्योत्पादन हे सरासरीच्या आसपास राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, असे असले तरी जिल्हयातील प्रकल्पांमध्ये अवघा सात टक्के जलसाठा शिल्लक असल्याने परतीच्या पावसावरच भविष्यातील पाणी आरक्षणाची मदार राहणार असल्याचे चित्र आहे. अद्यापही जिल्हयातील ४२ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे परतीचा पाऊस येत्या काळात कसा बरसतो यावरच खरीपाचे उत्पादन आणि पाणीसमस्येच्या निराकरणाचे गुपीत दडले आहे. बुलडाणा जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनानंतर दोन दिवसात सरासरी ८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २३ जुलै ते १४ आॅगस्ट दरम्यानची पावसाची ओढ पाहता पडलेला हा पाऊस जिल्ह्यातील सहा लाख ९८ हजार हेक्टरवरील पिकांना नवसंजीवनी देणारा ठरला आहे. कपाशीसह अन्य पिके ही फुलोर्यात तथा फळधारणेच्या स्थिती आलेली असतानाच हा पाऊस पडल्याने कपाशीचे फळ, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, मका पिकांचे दाणे भरण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे. त्यातच खरीपाचा आॅगस्ट महिन्यातील पहिला पूर्वानूमान कृषी विभागाने काढला असून शेतकर्यांच्या दृष्टीने हा अनुमान दिलासादायक आहे. पुढील काळात आणखी तीन अंदाज कृषी अंतर्गत पातळीवर दरवर्षीच्या प्रक्रियेनुसार घेणार आहे. मात्र त्यासाठी परतीचा पाऊस अपेक्षेप्रमाणे बरसणे गरजेचे आहे. अन्यथा सध्या असलेले दिलासादाक चित्र मात्र प्रसंगी बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.