लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: जिल्ह्यातील सुधारित पैसेवारी ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली असून ती ५९ पैसे आली आहे. दरम्यान, असे असले तरी मेहकर, लोणार आणि सिंदखेड राजा तालुक्याची पैसेवारीही ५० पैशांच्या आत आल्याने या तालुक्यांना अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर नेमके कोणते लाभ मिळतात याकडे लक्ष लागून आहे. जिल्ह्याचा नजर अंदाज ६८ पैसे होता. नजर अंदाजमध्ये जिल्ह्यातील पिकांची स्थिती उत्तम असल्याचे दिसून आले होते. मात्र नंतर परतीचा पाऊस व प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगाच्या आधारे काढण्यात आलेल्या सुधारीत पैसेवारी ३६६ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत आली तर १०५३ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्यावर आली आहे. प्रामुख्याने लोणार तालुक्यातील ९१ गावांची पैसेवारी ही ४७ पैसे, मेहकरमधील १६१ गावांची ४७ आणि सिंदखेड राजा तालुक्यातील ११४ गावांची पैसेवारी ही ४६ पैसे आली आहे. आता अंतिम पैसेवारी नेमकी काय येते याकडे सध्या लक्ष लागून आहे.जिल्ह्यातील १४१९ गावांमधील पीक पैसेवारी काढण्यात आली असून जिल्ह्यातील २६ टक्के गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत आहे तर ७४ टक्के गावांची पैसेवारी ही ५० पैशसांच्यावर आहे. जिल्ह्यातील ९२ मंडळातील ५३५ सजांध्ये निवडक स्वरुपात उपजिल्हाधिकारी, एसडीअेा, तहसिलदार, नायब तहसिलदार यांनी हलक्या, मध्यम व भारी जमीनीच्या शेतात प्रत्येकी तीन पीक कापणी प्रयोग करून ही सुधारीत पैसेवारी गाव पैसेवारी समितीच्या सहकार्याने काढली आहे. दरम्यान आता ३१ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर होईल. त्यानंतर प्रत्यक्षात खरीपाच्या जिल्ह्यातील एकंदरीत स्थितीचे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान सुधारीत पैसेवारीत अेाल्या दुष्काळाचेही किंचीत दर्शन झाले आहे.
बुलडाणा जिल्ह्याची सुधारित पैसेवारी ५९ पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2020 11:33 AM