लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पंचायत राज व्यवस्थेमधील मध्यमस्तरावरील महत्त्वाची स्वायत्त संस्था असलेल्या जिल्ह्यातील १३ ही पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी ३१ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. यासंदर्भातील निर्णय जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी घेतला असून जिल्ह्यातील १३ ही तहसिलदार आणि जिल्हा परिषद प्रशासनास अनुषंगीक पत्रेही रवाना करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.दरम्यान, पंचायत समिती सभापतीपदासाठीची निवडणूक जाहीर झाल्यामुळे आता राजकीय हालचालांनी वेग घेतला असून राज्यात राजकीय परिवर्तन करत सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडीची भूमिका या सभापतींच्या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडीच्या राजकीय खेळीनुसार जर पत्ते पडले तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक नवे पर्व सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पक्षीय बलाबलचा विचार करता प्रामुख्याने बुलडाणा, चिखली, मोताळा, नांदुरा येथे काँग्रेसचा सभापती आहे तर मलकापूर, खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर येथे भाजपचा सभापती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे अनुक्रमे त्यांचे बलस्थान असलेल्या देऊळगाव राजा, सिंदखेड राजा आणि मेहकर व लोणार पंचायत समितीमध्ये सभापती आहेत.बुलडाणा जिल्ह्यातील १३ ही पंचायत समित्यांमिळून एकूण १२० पंचाय समिती सदस्य आहे. यामध्ये भाजप व काँग्रेसच्या सदस्यांची संख्या ही जवळपास सारखीच असून त्या खालोखाल शिवसेनेची सदस्य संख्या आहे. त्यामुळे प्रसंगी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यास खामगाव वगळता अन्यत्र नवी समिकरणे प्रसंगी उदयास येतील. मात्र महाविकास आघाडीच्या सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार स्वायत संस्थांमधील जुन्या आघाड्या किंवा युती तोडायची की नाही, याबाबत वरिष्ठस्तरावरून निर्णय होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे. येत्या एक दोन दिवसात त्याबाबत अधिकृतस्तरावर प्रसंगी भूमिका ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.दुसरीकडे ३१ डिसेंबर रोजी पंचायत समिती सभापती पदासाठी निवडणूक होत असून दुपारी १२ ते २ या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करणे, त्यानंतर अर्ज मागे घेणे व दुपारी तीन वाजता प्रत्यक्ष सभापती निवडीसाठी विशेष सभा घेण्यात येणार आहे.त्यानंतर सभापतीपदाची निवड होईल, असे सुत्रांनी स्पष्ट केले. प्रामुख्याने पंचायत समिती सभापतीपदासाठीची आरक्षण सोडत निघाल्यानंतर साधारणत: २० दिवसांच्या आत निवडणूक घ्यावी, असा अलिकडील काळातील दंडक आहे. त्यानुषंगाने १२ डिसेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यातील १३ ही पंचायत समित्यांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती.
बुलडाणा: पंचायत समिती सभापतींची ३१ डिसेंबरला निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 2:04 PM