बुलडाणा, दि. 28- गेल्या तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर बुलडाणावासियांना सोमवारी पहाटे गडद धुक्यात हरविलेल्या बुलडाण्याचा नजारा पाहायला मिळाला. या धुक्याचा मॉर्निंग वॉक करणाऱ्या व सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगलाच आनंद घेतला. बुलडाणा शहर समुद्र सपाटीपासून २१९० फूट उंच आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथे नयनरम्य वातावरण अनुभवयास मिळते. सोमवारची पहाट बुलडाणावासियांना एक वेगळा अनुभव देणारी ठरली.
पहाटे शहरातील संपूर्ण रस्त्यावर धुक्याचे साम्राज्य पसरले होते. या धुक्यामुळे सकाळी आठ वाजेपर्यंत १०० फुट समोरील वाहनेही दिसत नव्हते. सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी, बस व्यतिरिक्त वाहने नव्हती. या वातावरणाचा आनंद घेण्याकरिता अनेकांनी सकाळीच घाटात फिरण्याला प्राधान्य दिले. अनेक जण आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनांनी राजूर घाट व ज्ञानगंगा अभयारण्यास निसर्ग सफारीसाठी निघाले.