लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हा मुख्यालयाच्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघात तीन वेळा शिवसेनेचे आमदार राहलेल्या विजयराज शिंदे यांनी पक्षाने त्यांना यंदा उमेदवारी न दिल्यामुळे बंडाचा झेंडा हाती घेतला असून चार आॅक्टोबर रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.दरम्यान, बुलडाण्यात शिवसेनेचे संजय गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानंतर माजी आमदार विजयराज शिंदे हे बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याचे दोन आॅक्टोबर रोजीच स्पष्ट झाले होते. मुंबईवरून परत आल्यानंतर शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी समर्थकांची एक बैठक घेऊन अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याची घोषणाच केली. त्यामुळे बुलडाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. तब्बल ३५ वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ राहलेलो असताना सातत्याने आपणास स्थानिक पातळीवर अपमानीत करण्यात आले. दरम्यान, आज ज्यांना पक्षाने उमेदवारी दिली त्या दलबदलुंनी १९९५ मध्ये शिवसेनेसाठी, नंतर अपक्ष म्हणून, कधी पंजा तर अन्य चिन्हासाठी मते मागितली आहे. त्यांचा इतिहासही वेगळा असल्याचा आरोप करत निष्ठावान शिवसैनिकांसाठी तथा त्यांच्या आग्रहाखात आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, चार आॅक्टोबर रोजी आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे विजयराज शिंदे म्हणाले. आम्ही कधी मोदींच्या नावावर मते मागितली नाही आणि ‘वंचित’मुळे जिंकूनही आलो नाही.सदैव शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहलो. त्यांच्या नावावरच निवडणुका जिंकल्या त्यांच्या नावावरच मते मागितली प्रसंगी हारलोही, असे ते म्हणाले. पण ज्यांनी पाच पक्ष बदलले त्यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने निष्ठावान सैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. परिणामी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची माफी मागून आपण शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी शिवसेनेच्या विद्यमान उमेदवारावरही त्यांनी आरोप केले. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात आपण कोणाला पाडण्यासाठी नव्हे तर निष्ठावान शिवसेना कार्यकर्त्यांच्या हितासाठी तथा जिंकण्यासाठी रिंगणात उतरत असल्याचेही शिंदे म्हणाले. दरम्यान, विद्यमान खासदार यांच्याकडेच संपर्क प्रमुखपद, त्यांच्या घरातच युवा सेनेचे जिल्हा प्रमुखाचे पद आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी गत काळातील अनेक बाबीचा उहापोह केला. यासंदर्भात विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.
संपर्क प्रमुखांनी एबीफॉर्म वाटल्याचा आरोपयावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी आमदार विजयराज शिंदे म्हणाले की, विद्यमान खासदार तथा संपर्क प्रमुख प्रतापराव जाधव यांच्या राजीनाम्याच्या धमकीमुळे पक्ष नरमला व उमेदवारी दुसरीकडे दिली. राज्यातील शिवसेनेच्या उमेदवारांना मातोश्रीवर एबीफॉर्म देण्यात आले पण बुलडाण्याती एबीफॉम हा संपर्कप्रमुखांनी मेहकरमध्ये बुलडाण्याच्या उमेदवाराला थेट बेडरुमध्ये दिल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.
शिंदे, गोडेंमुळे निवडणुकीत रंगतविजयराज शिंदे हे चार आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, भाजपला मतदारसंघ न सुटल्यामुळे योगेंद्र गोडे यांनीही तीन आॅक्टोबर रोजीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बुलडाणा विधानसभा मतदारसंघात भाजव शिवसेनेच्या प्रत्येकी एका नेत्याने बंडखोरी केली आहे. सात आॅक्टोबर नामांकन अर्ज मागे घेण्याची शेवटची तारिख आहे. त्या दिवशी प्रत्यक्षात बुलडाण्यातील लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
अंतर्गत मतभेदांचा झाला स्फोटमाजी आमदार विजयराज शिंदे आणि विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यातील अंतर्गत शहकाटशहाचे राजकारण सर्वश्रूत आहे. जवळपास गेल्या पाच वर्षापासून या दोघांमध्ये शितयुद्ध सुरू होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी खा. जाधव यांनी त्यांच्या समर्थकाला उमेदवारी दिल्याने नाराज झालेले विजयराज शिंदे यांनी आता हे बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे बुलडाणा विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.