- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ‘लॉकडाउन’मुळे जिल्ह्यातील चारही एमआयडीसींमधील उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. सध्या जीवनावश्यक वस्तुंचेच उत्पादन सुरू आहे. यामुळे संबंधित कंपन्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे. कामगारांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला असल्याचे चित्र आहे. बुलडाणा जिल्ह्यात येळगाव, खामगाव, चिखली व मलकापूर येथे एमआयडीसी आहेत. यापैकी खामगाव येथील एमआयडीसी सर्वात मोठी असून येथे इतर ठिकाणच्या तुलनेत सर्वाधिक वस्तुंचे उत्पादन होते. यामध्ये सिमेंट, वीटा, पॅकींग फुड, मसाला, बिस्कीट, साबण यासह विविध प्रकारच्या उत्पादनांचा समावेश आहे. या सर्व उत्पादनांच्या निर्मितीसाठी जिल्ह्यातील हजारो कामगार याठिकाणी कार्यरत आहेत. या उद्योगधंद्यांमुळे स्थानिक नागरिकांना रोजगार प्राप्त झाला आहे. मात्र सध्या ‘लॉकडाउन’मुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर वस्तुंचे उत्पादन पूर्णपणे बंद आहे. यामुळे येथे कार्यरत असलेल्या कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘लॉकडाउन’ आणखी ३ मे पर्यंत असल्याने कामगारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संबंधित कंपन्यांनादेखील खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. ‘लॉकडाउन’ उठल्यानंतरही हे सर्व उद्योगधंदे सुरळीत होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले आहे.
कामगारांना घरबसल्या वेतन मिळणार का?‘कोरोना’ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील विविध कंपन्यांनी उत्पादन बंद ठेवले आहे. यापैकी काही कंपन्यांनी काम बंद असले तरी कामगारांना वेतन देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र जिल्ह्यातील किती कंपन्या कामगारांना घरबसल्या वेतन देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचा दुजोरा मिळाला नाही.
महिलांचेही अर्थचक्र बिघडलेजिल्ह्यातील छोट्या उद्योगांच्या ठिकाणी अनेक महिलादेखील काम करतात. आता संबंधित उद्योग बंद असल्याने त्या महिलांना घरीच थांबावे लागत आहे. यापैकी बºयाच महिला घरखर्च चालविण्यासाठी हातभार लावत असतात. सध्या उत्पन्न बंद असल्याने त्यांचे अर्थचक्र बिघडले आहे.