बुलडाणा: बेघरांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या बुलडाणा शहरातील निवारागृहातील तीन भिकारी २१ मार्च रोजीच अन्यत्र स्थलांतरीत झाले आहे. दरम्यान, मधल्या काळात आलेलेल्या दोघांना नियमीत तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता तेथून त्यांनीही पलायन केले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.जिल्हा मुख्यालयी गेल्यावर्षी पासून बेघरांसाठी जुनागव परिसरातील पालिकेच्या एका शाळेत निवारागृह उभारण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने शहरात भटकंती करणारे आणि निराधार व्यक्तींना ठेवण्यात येत होते गेल्या वर्षी बुलडाणा पालिकेने यासाठी बुलडाणा शहरात भिकाऱ्यांचा तथा बेघरांचाही सर्व्हे केला होता. त्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये हे निवारागृह पालिकेने सुरू केले होते. मे २०१९ पर्यंत बुलडाणा पालिकेनेच हे निवारागृह चालवले होते. त्यांनंतर एका सामाजिक संस्थेस ते चालविण्यास दिले होते. तेव्हापासून आजपर्यंत या निवारागृहात जवळपास ३० निराधार व्यक्ती तथा भिकाऱ्यांनी आश्रय घेतला होता. येथे सेवाही चांगली दिल्या जात होती. स्वच्छतागृहासह, दोन वेळेस जेवण, चहा, नास्ता अशा दर्जेदार सुविधा येथे पुरविण्यात येता. वर्तमान काळात येथे आश्रयाला आलेल्यांसाठी मनोरंजनाची सुविधा म्हणून टिव्हीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. दरम्यान, या निवारा गृहात मधल्या काळात आश्रयास असलेल्यांपैकी बहुतांश जण चांगले होऊन येथून निघून गेले आहेत. निवारा गृहात आश्रयास येणाºयांचे पोलिस प्रशासनाकडून व्हेरीफिकेशनही केले जाते. त्यामुळे त्यांचे एक रेकॉर्डही तयार होते.मात्र कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली तेव्हा या निराधारगृहात असणाºया तीन निराधारांनी येथून पलायन केले असल्याची माहिती पालिकेतील सुत्रांनी दिली. दरम्यान, दोन दिवसापूर्वी या निवारागृहात आणखी दोन दाखल झाले होते. नियमानुसार निवारा गृहात त्यांना घेण्या अगोदर त्यांची आरोग्य तपासणी करण्यासोबतच त्यांचे पोलिस व्हेरीफिकेशन करण्यासाठी त्यांना निवारागृहातील कर्मचाºयाने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले होते. मात्र तेथे ओपीडीची चिठ्ठी काढण्यासाठी कर्मचारी गेला असता या दोन्ही निराधारांनी तेथून पलायन केल्याची माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली. त्यामुळे आता निराधार गृहामध्ये सध्या एकही व्यक्ती नसल्याचे पालिकेतील सुत्रांनी स्पष्ट केले.
बुलडाणा: जिल्हा मुख्यालयातील निवारागृहही रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 5:21 PM