बुलडाणा : जिल्ह्यातील पाच तालुक्यात सरत्या वर्षात स्त्री-पुुरुष गुणोत्तराचे प्रमाण संवेदनशील आकड्यापर्यंत पोहोचले आहे. त्यातच बेकायदेशीर गर्भपाताची माहिती देणार्या खबऱ्या पूर्वी मिळणार्या २५ हजार रुपयांच्या बक्षीसात तीनपट वाढ करून ते एक लाख रुपये करण्यात आले आहे. परिणामी बुलडाणा जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भपात करण्याच्या प्रकाराला आळआ बसण्यास मदत होण्याची साधार शक्यता व्यक्त केली जात आहे. बुलडाणा जिल्ह्यात तब्बल ८७ सोनोग्राफी सेंटर आणि दीडशे नोंदणीकृत एमटीपी (गर्भपात केंद्र) केंद्र आहेत. दर तीन महिन्यांनी या केंद्रांची तपासणी होत असली तरी चालू वर्षात देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, आणि जळगाव जामोद तालुक्यातील स्त्री-पुरुष गुणोत्तर हे ८१९ ते ८८८ प्रती हजारी दरम्यान पोहोचले आहे. वास्तविक ते किमान ९५२ च्या आसपास असणे अपेक्षीत असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे. लोणार शहरात १८ डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीररित्या गर्भपात करताना जादा रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला होता. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता पाटील यांनी याप्रश्नी थेट लोणार गाठून डॉ. पुरोहीत याच्या रुग्णालया सील लावले होते. पोलिसात दाखल तक्रारीनंतर डॉक्टर पुरोहीतसह मृत मुलीच्या मातापित्यांना अटक पोलिसांनी अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथेही बेकायदेशीर गर्भपात केंद्र असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कारवाईदरम्यान समोर आले होते. दोन डिसेंबर रोजी या प्रकरणात तीन डॉक्टरांसह एका सहकार्याविरोधात गुन्हे दाखल झाले होते. या दोन्ही प्रकरणामुळे बुलडाणा जिल्ह् यातील सोनोग्राफी केंद्र आणि नोंदणीकृत एमटीपी केंद्र हे आरोग्य विभागाच्या रडारवर आले आहेत. २०१० पासून जिल्ह्यातील आठ प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ठ आहेत. ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूआमची मुलगीडॉटजीओव्हीडॉटईन’ या संकेतस्थळावरही या संदर्भात तक्रार करण्याची सुविधा देण्यात आलीआहे.
खबऱ्याच्या बक्षीसात वाढ
बेकायदेशीर लिंग तपासणी तथा गर्भपाताची माहिती पुरविणार्यास पूर्वी २५ हजार रुपयांचे बक्षीस दिल्या जाते. मात्र आता पुणे येथील राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने राज्यातील सर्व जिल्हा सामान्य रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र तथा उपकेंद्रांना २० नोव्हेंबर रोजी थेट पत्र पाठवून अशा प्रकाराची माहिती देणार्या व्यक्तीस खबर्या योजनेतंर्गत एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. माहिती देणार्याचे नाव त्याच्या इच्छेनुसार गुप्त ठेवण्यात येणार आहे. सामान्य नागरिक, आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकारी तथा इतर शासकीय, निमशासकीय कर्मचारी अधिकारी अशी कोणतीही व्यक्ती याबाबत माहिती देऊ शकते. उपरोक्त बक्षीस योजनेतंर्गत तक्रारीत तथ्य आढळून आल्यास, संबंधित केंद्र तथा व्यक्तीवर खटला दाखल झाल्यानंतर ही बक्षीसाची रक्कम माहिती देणार्यास वितरीत करण्यात येणार असल्याचे, आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण माताबाल संगोपन आणि शालेय आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक यांनी सबंधित पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
प्रती हजारी ८५५ मुली
जिल्ह्याचे २०११ च्या जनगणणेनुसार प्रती हजारी ८५५ ऐवढे प्रमाण आहे. त्यामुळे तसा जिल्हा हा या दृष्टीने संवेदनशीलते मध्ये मोडतो. संपणार्या २०१७ वर्षाचा विचार करता एप्रिल ते सप्टेंबरदरम्यानची माहिती घेतली असता देऊळगाव राजा (८८८), सिंदखेड राजा (८४६), लोणार सर्वात कमी (८१९), मेहकर (८६६) आणि जळगाव जामोद (८७४) ऐवढे प्रमाण आहे. हे आकडे सध्या प्रगतीपर आकडे आहेत. परंतू सरासरी विचार करता तसे हे प्रमाण चिंतनीय म्हणावे लागेल. नाही म्हणायला जिल््हयात बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान २२ जानेवारी २०१५ पासून राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून ते राबविण्यात येत असून त्यासंदर्भात जिल्ह्यात डॉक्टरांचे, सोनोग्राफी सेटर, एमटीपी केंद्र संचालकांचे वर्कशॉपही घेण्यात आले आहे.