लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील ५९ उमेदवारांच्या निवडणूक हिशेबाची जुळवाजुळव सध्या सुरू झाली आहे. उमेदवारांच्या खर्चाचा अहवाल तयार करण्यासाठी २४ नोव्हेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे. त्यानुसार तीन निवडणूक निरिक्षक अधिकारी उमेदवारांच्या खर्चाची इत्यंभूत माहिती घेण्याच्या कामाला लागले आहेत.विधानसभा निवडणुकीला २१ नोव्हेंबरला महिना पूर्ण होत आहे. निवडणुकीदरम्यान उमेदवारांच्या होणाऱ्या खर्चाची इत्यंभूत माहिती निवडणूक विभागाला सादर करणे आवश्यक असते. जिल्ह्यातील सातही मतदारसंघातील ५९ उमेदवारांनी खर्चपत्रके सादर केली आहेत. उमेदवारांचा खर्च व विशेष समितीने सबंधित उमेदवाराचे केलेले लेखापत्रक याचा ताळेबंद पाहून निवडणूक निरीक्षकांकडून पडताळणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने नेमणूक केलेले निवडणूक निरिक्षक १८ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. उमेदवारांनी केलेला निवडणूक खर्च निकाल लागल्यापासून ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक असते. निवडणूकीदरम्यान मलकापूर, खामगांव व जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक ब्रजेश कुमार, बूलडाणा व चिखली विधानसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक कण्व बाली, आयकर विभागाचे श्रवण कुमार यांनी काम पाहिले होते. आता निवडणूक खर्चाची तपासणी करून अंतीम अहवाल तयार करण्याची मुदत जवळ आली असल्याने निवडणूक निरिक्षक खर्च तपासणीच्या कामात व्यस्त आहेत. बुलडाणा व चिखली विधानसभा मतदारसंघात कण्व बाली, सिंदखेड राजा व मेहकर मतदारसंघात निदिश सिंघल, मलकापूर, खामगाव व जळगाव जामोद मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च ब्रजेशकुमार तपासत आहेत.
शॅडो रजिस्टर व उमेदवारांचा खर्चाचा ताळमेळशॅडो रजिस्टर व उमेदवारांनी सादर केलेला खर्च याचा ताळमेळ लावण्यासाठी निवडणूक निरिक्षक मतदारसंघातील मुख्यालयात दाखल झाले आहेत. खर्चाबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. जिल्ह्यातील ५९ उमेदवार व त्यांचे प्रतिनिधींची बैठक घेऊन सादर केलेल्या खर्च वितरणाची पडतळणी करणार आहेत.
तीन निवडणूक निरिक्षकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तपासणी सध्या केली जात आहे. उमेदवारांच्या खर्चाचा अहवाल तयार करुन तो निवडणूक विभागाकडे सादर केल्या जाईल. २४ नोव्हेंबरपर्यंतच खर्चाचा अंतीम अहवाल पूर्ण होईल.- गौरी सावंत,उपजिल्हाधिकारी निवडणूक़