लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गाची जिल्ह्यात वाढती व्याप्ती पाहता टाटा ट्रस्टच्या सहकार्याने उभारण्यात आलेले कोवीड डेडीकेटेड हॉस्पीटल आॅगस्टच्या पहिल्या आठवड्या अखेर कार्यान्वीत होणार आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच या हॉस्पीटलचे ई-उद्घाटन होणार आहे.त्यानुषंगाने अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रविवारी या रुग्णालयाची संपूर्ण पाहणी करत येथील कामाचा संपूर्ण आढावा घेतला. दरम्यान, देऊळगाव राजा येथेही २० बेडचे सुसज्ज कोवीड हॉस्पीटलही याच आठवड्यात कार्यान्वीत होत असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ३१ जुलै रोजी बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची स्थिती, पायाभूत सुविधा व तत्सम बाबींची सविस्तर माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेदरम्यान त्यांनी दिली. त्यानंतर प्रत्यक्ष बुलडाणा येथील कोवीड डेडीकेटेड हॉस्पीटलमधील कामाच्या स्थितीची त्यांनी पाहणी केली. दोन तास येथील एकंदरीत स्थिती व कामाच्या दर्जाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.बुलडाणा व सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे टाटा ट्रस्टच्या सहकार्यातून डेडीकेटेड कोवीड रुग्णालयासाठी मदत देण्याची भूमिका टाटा ट्रस्टने मे महिन्यात दाखवली होती. त्यानुषंगाने टाटा ट्रस्टचे लक्ष्मण सेतुराम यांना पुणे येथील आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी अनुषंगीक अनुमतीचे पत्रच आठ मे रोजी दिले होते.त्यानंतर बुलडाणा येथील १०० बेडच्या स्त्री रुग्णालयात कोवीड डेडीकेटेड हॉस्पीटल तयार करण्यासोबतच सुमारे चार कोटी रुपयांच्या सुविधा येथे उपलब्ध करण्याचे काम सुरू झाले होते. टाटा ट्रस्टचे वैद्यकीय सल्लागार संतोष भोसले यांच्या सहकार्यातून बुलडाणा येथे हे काम सुरू झाले होते. प्रकरणी टाटा ट्रस्टचे एजीएम आशिष लोणारे यांच्यासोबतही पालकमंत्र्यांनी बैठक घेतली होती. आता या डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटलचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्यावर अंतिम हात फिरविण्यात येत आहे.प्रत्यक्ष या हॉस्पीटलचा कोवीड रुग्णांना लाभ व्हावा यादृष्टीने ते लवकर कार्यान्वीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. कोरोना बाधीतांची संख्याही १५०० च्या टप्प्यात आहे. त्यानुषंगानेच मुख्यमंत्र्यांशी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी ३१ जुलै रोजी सविस्तर चर्चा करीत आॅगस्टच्या पहिल्याच आठवड्यात रुग्णालय कार्यान्वीत करण्याच्या हालचालींना वेग दिला असून शुक्रवारी किंवा शनिवारी त्याचे उद्घाटन होईल.
कोवीड हॉस्पीटलसाठी १२९ मनुष्यबळ आवश्यककोवीड हॉस्पीटलसाठी १२९ जणांचे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना यापूर्वीच पत्र देण्यात आले आहे. ९७ पदांना मान्यता असून त्यापैकी १९ पदे यापूर्वीच भरण्यात आलेली असल्याची माहिती आहे.रुग्णालयात १२ बेडचे आयसीयू युनीट उभारण्यात आले आहे. सेंट्रल आॅक्सीजनची सुविधा रुग्णालयात उपलब्ध असून १०० बेड सज्ज करण्यात आले आहेत. सोबतच प्रत्येक बेडवर आॅक्सीजनची सुविधा उपलब्ध आहे.
रुग्णालयाचे स्वतंत्र जलशुद्धीकरण यंत्र असून रुग्णालयात सर्वत्र आरोच्या पाण्याची उपलब्धता करण्यात आलेली आहे. व्हॅक्युम ट्रिटमेंट प्लॅन्टही येथे आता कार्यान्वीत झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
रुग्णालयात ३२ जम्बो आॅक्सीजन सिलेंडर, कार्डीयाक बेड्स, मॉनिटर्स सुविधा, १२ व्हेंटीलेटर, आयसोलेशन वॉर्ड, जनरल वॉर्ड, दहा ओपीडी रुम, किचन रुम यासह अन्य सुविधा येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत.