बुलडाणा: कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करण्यासाठी होणारा विलंब पाहता बुलडाणा जिल्ह्यातच कोरोना तपासणीसाठी प्रयोग शाळा उभारण्यास मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. या प्रयोग शाळेमध्ये दहा कर्मचाºयांची अवश्यकता असून लवकरच ही प्रयोगशाळा बुलडाण्यात सुरू होणार आहे.ही प्रयोग शाळा उभारण्यासाठी येणारा दीड कोटी रुपयांचा खर्च एनआरएचएममधून करण्यात येणार असून हा निधीही त्वरित देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी व काही निवडक अधिकाºयांची बैठक घेवून याबाबत माहिती दिली. तसेच प्रसारमाध्यमांशी बोलतानाही त्यांनी बुलडाण्यात लवकरच ही प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.जिल्ह्या लगतच्या अकोला, जळगाव खान्देश, औरंगाबाद, जालना जिल्ह्यात कोराना संसर्गाची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे त्यांच्याकडील चाचण्यांची संख्या वाढली असून त्यात बुलडाणा जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करण्याची भर पडल्याने या प्रयोगशाळांवर दबाव वाढला होता. बुलडाण्यातून अकोला, यवतमाळ आणि नागपूर येथे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. त्यामुळे त्याचे अहवाल येण्यास विलंब लागत होता. त्या दरम्यान, संदिग्ध रुग्ण, त्याच्या कुटुंबियांची स्थिती आणि यंत्रणेचा जाणारा वेळे यामुळे एक प्रकारचा तणाव प्रशासकीय पातळीसह संदिग्ध रुग्णांच्या कौटुंबिकस्तरावर येत होता. त्यामुळे बुलडाण्यातही कोरोना तपासणीसाठी लॅब सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकंदरीत बुलडाणा जिल्ह्यातील लगतच्या जिल्ह्यात वाढलेला संसर्ग पाहता जिल्हयातील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात राहण्यासाठी व निदान लवकरच होण्यासाठी ही लॅब सुरू करण्यात येणार आहे.आगामी काळात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चाचण्यांचे रिपोर्ट त्वरित मिळणे अपेक्षीत आहे. त्यादृष्टीकोणातून ही भूमिका घेण्यात आली आहे.