बुलडाणा: गेल्या आठवड्यात तापमानातील चढउतार झाल्यानंतर बुलडाणा शहर परिसरात थंडीचा जोर आता वाढला असून शनिवारी सकाळी साडेआठ वाजता बुलडाणा शहराचे तापमान ९.५ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले. शुक्रवारच्या किमान तापमानाच्या तुलनेत आणखी ते तीन अंश सेल्सिअसने घटले आहे. गेल्या १५ दिवसापासून हवामानातील अनाकलीनय बदल आणि तापमान कक्षेत विषम स्वरुपाच्या झालेल्या बदलानंतर आता राज्यात थंडीचा जोर वाढत असतानाच बुलडाण्याचे तापमान शनिवारी सकाळी ९.५ नोंदविल्या गेले. बुलडाणा शहराचे १७ डिसेंबर रोजी किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस नोंदवल्या गेले होते. त्यानंतर शुक्रवारी अर्थात २७ नोव्हेंबर रोजी ते १२.५ होते तर शनिवारी ते ९.५ अंश सेल्सिअस होते. राज्यात थंडीचा कडाका वाढत असतानाच बुलडाण्यातही थंडीने जोर धरला आहे. वाढती थंडी ही कोल्ड क्राफ्टसाठी उपयुक्त आहे. दरम्यान, गेल्या वर्षी बुलडाणा शहराचे गेल्या तीन वर्षातील निच्चांकी असे ७.८ तापमान २९ डिसेंबर २०१८ रोजी नोंदविल्या गेले होते. त्यानंतरचे हे आताचे ९.५ अंश सेल्सिअस तापमान आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. बुलडाणा जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सराससीच्या २२ टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्यातच अवकाळी व परतीच्या पावसानेही जिल्ह्यात आॅक्टोबर, नोव्हेंबमध्ये सरासरी ११ दिवस हजेरी लावली होती. पडणारा हा अवकाळी पाऊसही सरासरीच्या २१८ टक्के पडला आहे. डिसेंबर महिन्यातही अवकाळी पावसाने जिल्ह्यात दोनदा हजेरी लावली आहे. त्यामुळे जमीनीमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणावर ओल आहे. रब्बी हंगामासाठी ही ओल उपयुक्त असली तरी त्यामुळे थंडीचा जोर जिल्ह्यात येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान खात्यानेही राज्यात किमान तापमानात घट होण्याचे संकेत दोन दिवसापूर्वी दिले होते. त्याचा प्रयत्य आता येत आहे. गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण ही दिसून आले आहे. पहाटे धुक्याचे प्रमाणही बुलडाणा शहर परिसर व तालुक्याच्या भागात दिसून येत आहे.
बुलडाण्यात थंडीचा जोर वाढला; किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअसवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 3:32 PM