बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढिचा वेग वाढलेला असतानाच दोन जून रोजी कोरोनामुक्त झालेल्या नऊ जणांना खामगाव येथील आयसोलेशन कक्षातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये जळका भडंग येथील आठ व टुनकी येथील एकाचा समावेश आहे.कोरेनावर मात करणाºयांमध्ये पाच पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. खामगाव तालुक्यातील जळका भडंग येथे एकाच दिवशी आठ रुग्ण पॉझिटव्ह आढळून आले होते. पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या एका युवकामुळे ही लागन झाली होती. त्यामुळे छोट्याश्या जळका भडंग गावात नऊ कोरोना बाधीत झाले होते. परिणाणी या गावात समुह संक्रमणाचा धोका निर्माण झाला होता.आरोग्य, महसूल, जि. प. व पोलिस प्रशासनाने येथील परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चांगल्या पद्धतीने केल्याने येथील स्थिती नियंत्रणात येण्यास मदत झाली. परिणामी कोरोनाची लक्षणे नसलेल्या खामगाव आयसोलेशन कक्षातील उपरोक्त नऊ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. नव्या मार्गदर्शक तत्वानुसार ही सुटी करण्यात आली आहे. या रुग्णांमध्ये तीव्र स्वरुपाचा ताप नसणे, शरीरातील आॅक्सीजनचे प्रमाणही ९५ टक्के असणे अशी सुदृढ आरोग्याची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दरम्यान, संग्रमापूर तालुक्यातील टुनकी येथीलही एकाला सुटी देण्यात आली आहे. त्याचीही प्रकृती ठणठणीत झाल्यामुळे त्याला सुटी देण्यात आली. परिणामी संग्रामपुर तालुक्यातील टुणकी भागातील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे सध्या तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॉब नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यात जर सर्व अहवाल निगेटीव्ह आले तर मंगळवारचा दिवस बुलडाण्यासाठी दिलासा देणारा ठरेल.
४२ व्यक्ती कोरोना मुक्त जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४२ वर पोहोचली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्के झाले आहे. मधल्या काळात जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण वाढल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घसरले होते. ते ४९ टक्क्यांवर आले होते. मात्र मंगळवारी सकाळी नऊ जणांनी कोरोनावर मात केल्याने जिल्ह्यातील कोरोना मुक्त झालेल्यांचा आकडा हा ३३ वरून ४२ वर पोहोचला आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. सध्या २४ कोरोना बाधीतांवर शेगाव, खामगाव आणि बुलडाणा येथील कोवीड-१९ रुग्णालयात उपचार करण्यात येत असून रुग्णालयातील सर्व कोरोनाबाधीतांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयीन सुत्रांनी सांगितले. दरम्यान, खामगाव येथून तीन जून रोजी आणखी दोघांना सुटी होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार या रुग्णांना कुठलाही त्रास नसल्यास प्रसंगी त्यांची आयसोलेशन कक्षातून सुटी केल्या जावू शकते.