बुलडाणा: शिवजयंती उत्सवामध्ये देशभक्ती अवतरल्याचे चित्र बुलडाण्यात दिसून आले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही साध्या पद्धतीने साजरी करून दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. शिवभक्तांनी काढलेल्या सद्भावना मदत फेरीत एक लाख रूपयांचा निधी बुलडाणा शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जमा करण्यात आला. देशाच्या सीमेवर रक्षणाची जबाबदारी असलेल्या भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले आठ दिवसांपूर्वीच सावरगाव डुकरे येथील जवान ही कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने शहरातील जिजामाता प्रेक्षगार मैदानावर सकाळी नऊ वाजता साजरा करण्यात आला. यावेळी शिवरायांना मानवंदना देण्यात आली, जिजाऊ वंदना घेऊन शहीद जवानांना सामूहिक आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शहरातील अनेक मान्यवर वैद्यकियक्षेत्र, विधिक्षेत्र, राजकिय क्षेत्र, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व विविध शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी प्राध्यापक व शिवभक्त उपस्थित होते. शिवजयंती समितीचे अध्यक्ष सागर काळवाघे यांनी उत्सव समीतीची भूमिका विषद केली. जिजामाता प्रेक्षगार मैदानातुन सदभावना रॅलीला सुरुवात झाली. याचवेळी जवानांच्या कुंटुबीयांना आर्थिक मदत करण्याच्या दृष्टिने मदत निधी संकलन करण्यास सुरुवात केली. स्वइच्छेने सढळ हाताने नगरीकांनी मदत केली. संगम चौक जयस्तंभ चौक, आठवडी बाजार, कारंजा चौक मार्ग ही सद्भावना रॅली भ्रमण करत गोरे हुतात्मा स्मारक येथे आल्यानंतर हुतात्मा स्मारकात शहीदांना आदराजली वाहुन राष्ट्रगीताने सद्भावना रॅलीची सांगता झाली. या कार्यक्रमामध्ये बुलडाणा शहरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हुतात्मा स्मारक येथे आदरांजली चा कार्यक्रम झाल्यानंतर स्थानिक विश्रामगृह येथे सद्भावना रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांच्या उपस्थितीत मदत निधी अंतर्गत जमा करण्यात आलेल्या मदत निधी पेट्या सर्वांच्या समक्ष फोडण्यात आल्या. ८० हजार रुपयांची रक्कम या मदतीतून जमा झाली. त्यानंतर शिवजन्म उत्सव समितीच्या सदस्यांनी त्याच ठिकाणी वीस हजार रुपये जमा करून एक लाख रुपये मदत निधी जमा केला हा निधी जवानांच्या कुटुंबीयांना देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
बुलडाणा: शिवजयंतीत अवतरली देशभक्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 5:23 PM