- नीलेश जोशीबुलडाणा : भारतीय जैन संघटना आणि प्रशासनाच्या समन्वयातून बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात आलेले ‘सुजलाम सुफलाम बुलडाणा’ अभियान राज्यातील चार जिल्ह्यात राबविण्यात येणार असतानाच राष्ट्रीयस्तरावर काही निवडक राज्यातील किमान एका जिल्ह्यात ‘बुलडाणा पॅटर्न’ म्हणून राबविण्याच्या हालचालींना वेग आला आहे.यासंदर्भात भारतीय जैन संघटनेने शांतीलाल मुथा व केंद्र सरकारच्या काही अधिकाºयांमध्ये सविस्तर चर्चा होऊन अनुषंगीक निर्णय येत्या काळात होण्याची शक्यता ‘सुजलाम सुफलाम’ प्रकल्पाचे बुलडाणा जिल्हा मुख्य समन्वयक राजेश देशलहरा यांनी दिली. दरम्यान, याची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी सर्वंकष बाबींचा विचार करून उपरोक्त निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. आतापर्यंत त्यानुषंगाने तीन बैठका झाल्या असून, आणखी काही बैठका त्याबाबतीत होणार आहे. महाराष्ट्राचे जलसंधारण सचिव एकनाथ डवले हे देखील याबाबत उत्सूक असल्याची माहिती आहे.ज्या राज्यात बीजेएसचे नेटवर्क आहे अशा ठिकाणी प्रशासकीय पातळीवरील समन्वय राखून हा बुलडाणा पॅटर्न जसाच्या तसा राबविण्यात येण्याच्या दृष्टीने या हालचाली आहेत. त्यामुळे पुढील काळातील बैठकांमधून येणाºया निष्कर्षाच्या आधारावर प्रसंगी राष्ट्रीय पातळीवर या उपक्रमाची व्याप्ती वाढणार असल्याचे संकेत आहेत. सध्या उस्मानाबाद, लातूर, अकोला आणि वाशिम या चार जिल्ह्यात पुढील काळातील अभियान राबविण्याच्या दृ्ष्टीने संघटनेतर्फे अंमलबजावणीस्तरावर पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. मार्च ते जून २०१८ दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात जवळपास ४० टक्के काम झाल्याचा अंदाज असून आणखी ६० टक्के काम येत्या काळात करून जिल्ह्याच्या जलसमृद्धीमध्ये अधिक वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे या अभियानाचे जिल्हा समन्वयक राजेश देशलहरा यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.