- हर्षनंदन वाघ
बुलडाणा: क्षुल्लक कारणावरून घरच्यांशी भांडण झाल्याने आत्महत्या करण्यास निघालेल्या मायलेकांना बुलडाणा पोलिसांनी जीवदान दिले. पोलिसांच्या सतर्कमुळे एका चिमुकल्यासोबतच महिलेचेही प्राण वाचले. त्यामुळे पोलिसांच्या सहृदयतेबाबत समाजमनात चांगल्या प्रतिक्रीया उमटत आहेत.
घरच्यांशी वाद झाल्यामुळे गुरूवारी रात्री ११ वाजता एक महिलेने चिमुकल्यासोबत घर सोडले. शहरातील एका हॉस्पीटल समोरील तलावावर ही महिला पोहोचली. तितक्यात चिमुकले बाळ रडत असल्याने ती खाली बसली. बाळाला दूध पाजत असताना स्वत:ही हुंदके देत होती. तेवढ्यात एएसआय मधुकर मैंद, एनपीसी भागवत कºहाळे, पोका शांताराम घुये रात्रीच्या गस्तीदरम्यान घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तिची चौकशी केली असता, घरच्यांशी भांडण झाल्यामुळे आत्महत्येच्या विचाराने बाहेर पडल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिचे समुपदेशन केले. तिच्या माहेरचा पत्ता विचारून तिला चिमुकल्यासह माहेरी सुखरूप पोहचविले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मायलेकांचा जीव वाचल्याची चर्चा आहे.
पोलिसांकडून महिलेचे समुपदेशन!
क्षुल्लक वादातून टोकाचा निर्णय घेऊ नको. घरच्यांच्या भांडणात तुझा आणि चिमुकल्याचा नाहक जीव जाईल. शांत डोक्याने विचार कर, असा सल्ला देत पोलिसांनी तसेच पोलिस निरिक्षक यु.के. जाधव यांनी सदर महिलेचे समुपदेशन केले.
घरच्यांशी भांडण झाल्याने आत्महत्येच्या बेताने द्विधा मन:स्थितीत निघालेल्या एका महिला पोलिसांना रात्रीच्या गस्ती दरम्यान आढळून आली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेसह चिमुकल्याचे प्राण वाचले. महिलेला तिच्या माहेरी पोहोचविण्यात आले.
- यु.के. जाधव,पोलिस निरिक्षक, बुलडाणा