लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरात कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात आणिबाणीची स्थिती निर्माण झाली असून बुलडाणा शहर आंतरबाह्य सील करण्यात येत आहे. त्यादृष्टीने आतील भागात १२ व बाह्य भागत १२ आणि शहराच्या सीमावर्ती भागात एकूण नऊ अशा ३३ ठिकाणी बुलडाणा शहराच्या सीमा सील करण्यात येणार आहेत.यासंदर्भात पोलिस दलाने कृती आराखडा तयार केला असून रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यास मान्यता मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी प्रारंभ होणार आहे. दुसरीकडे आरोग्य विभागाने कोरोना पॉझीटीव्ह मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी कॉम्बींग आॅपरेशन सुरू केले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी दिली. आरोग्य विभाग, पालिका प्रशासन आणि महसूल प्रशासनास त्यादृ्ष्टीने पोलिस प्रशासनही सहकार्य करत असून मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना इंस्टीट्यूशनल क्वारंटीन किंवा होम क्वारंटीनमध्ये ठेवण्यात येणार आहे.दरम्यान, आरोग्य विभागाने मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा सर्व्हे सुरू केला असून त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच हे कोंबींग आॅपरेशन सुरू करण्यात येत आहे. दरम्यान, बुलडाणा शहरातील स्थिती गंभीर बनली असून नागरिकांनी त्याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. सोबतच आगामी काळासाठी बुलडाणा शहरातून बाहेर व बाहेरून बुलडाणा शहरात एकही व्यक्ती येणार नाही, अशा पद्धतीने बुलडाणा शहर सील करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.दरम्यान, बुलडाणा शहर पुर्णत: लॉक डाऊन झाले असून संचारबंदीसह अनुषंगीक विषयान्वये दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी ही अत्यंत गंभीरतेने करण्यात येत आहे. दरम्यान, स्त्री रुग्णालयातील आयसोलेशन कक्षामध्ये आतापर्यंत २२ व्यक्तींना ठेवण्यात आले असून रात्रीतून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बुलडाणा : मृतकाच्या संपर्कातील ६० जण क्वारंटीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 11:56 AM