- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतही पदासाठी राजकारण तापले असून जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदावरून सध्या तीनही घटक पक्षात रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, असे असले तरी तुटेपर्यंत ताणायचे नाही ही सामंजस्यपूवर्क भूमिका तिन्ही पक्षांची असल्याने सहा जानेवारी रोजी दुपार पर्यंत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, बांधकाम सभापती अन्य तीन सभापतीपदे कोणाच्या पारड्यात पडणार हे निश्चित होईल, असे संकेत आहेत.बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक आठ जानेवारी रोजी होत आहे. राज्यात सत्ता समिकरणे बदलल्यानंतरच बुलडाणा जिल्हा परिषदेमधीलही समिकरणे बदलण्याचे संकेत मिळाले होते. मधल्या काळात जिल्हा परिषद अध्यक्ष पदाला काही काळ मुदत वाढ मिळाली होती. ही मुदत वाढ २० डिसेंबर २०१९ रोजी संपुष्टात आल्याने आता जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाचे आरक्षण हे सर्वसाधरणसाठी (महिला) राखीव आहे. जिल्हा परिषदेचे ६० सदस्य असले तरी भाजपच्या एका सदस्याने राजीनामा दिल्याने सध्याची जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ही ५९ आहे. यामध्ये काँग्रेस १४, शिवसेना ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेस नऊ अशी सदस्य संख्या आहे. तर भाजपचे सदस्य २४ आहे.जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देत उपाध्यक्षपद आपल्या पदरात पाडून घेतले होते. आता राज्यातील सत्ता समिकरणे बदलल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा दिलेला पाठिंब्याचा टेकू जवळपास काढल्यात जमा आहे. त्यामुळे आठ जानेवारी रोजी महाविकास आघाडीची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये येणार असल्याचे जवळपास निश्चीत आहे. सदस्य संख्येचा विचार करता काँग्रेसचे जिल्हा परिषदेमध्ये १४ सदस्य आहे. त्यामुळे आपसूकच काँग्रेसकडे जिल्हा परिषद अध्यक्षपद जाणार असल्याचे संकेत आहेत. मात्र उपाध्यक्षपद आपणास मिळावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीतील दुसरा मोठा पक्ष असल्याने शिवसेना उपाध्यक्षपदावरही दावा सांगत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही जिल्हा परिषद उपाध्यक्षपद हवे आहेत. त्यामुळे या एका मुद्द्यावर आघाडीत अद्याप एक मत झाले नसल्याची चर्चा असून महाविकास आघाडीतील सुत्रांनीही त्यास दुजोरा दिला आहे. मात्र सहा जानेवारीला दुपार पर्र्यंत यावर तोडगा निघणार असलचे सांगण्यात येत आहे. प्रारंभी भाजप सोबत एकत्र येत सत्ते बसत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद उपाध्यक्षपद आपल्या गळ््यात पाडून घेतले होते. मधल्या काळात पदाधिकारी बदालाचे भाजप, राष्ट्रवादीत वारे वाहले होते. लोकसभा निवडणुकीतही या मुद्द्यावर काँग्रेसचा राष्ट्रवादीवर दबाव वाढला होता.त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा राष्ट्रवादीला महाविकास आघाडीत उपाध्यक्षपद न देता ते शिवसेनेला द्यावे, अशी भूमिका शिवसेनेची असल्याचे सुत्राचे म्हणणे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतंर्गतही काही सदस्यांमध्ये धुसपूस असल्याचे बोलले जात आहे.
बुलडाणा: जि. प. उपाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 2:34 PM