- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गाच्या साथीचा उद्रेक रोखण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा एकीककडे प्रयत्न करत असतानाच जिल्ह्यात सारी सदृश्य आजाराचेही रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. सुदैवाने दोन दिवसापूर्वी सारीच्या आजाराच्या रुग्णांचे पाठविण्यात आलेले पाच स्वॅब नमुनेही निगेटीव्ह आले आहेत.बुलडाणा जिल्ह्यात २८ एप्रिल रोजी कोरोना संसर्गाने एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास प्रारंभ झाला होता. याच दरम्यान दोन एप्रिल रोजी जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले होते. दरम्यान, दहा एप्रिल रोजी बुलडाणा जिल्ह्यातील कोलोरी येथील एका ६३ वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्याने तिला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला होता. तिचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. ते निगेटीव्ह आले होते. मात्र या महिलेला सारी अर्थात सिव्हीअर अॅक्युट रेस्परेटरी इन्फेक्शन झाले होते, असे नंतर समोर आले होते. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात अधिक गंभीरतने सारी आजाराच्या रुग्णांची शोध मोहिम हाती घेण्यात आली होती. दररोज जिल्हा प्रशासनाकडे किमान दोन व्यक्ती सारी सदृश्य आजाराने ग्रस्त असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. २३ एप्रिल रोजीही तीन व्यक्ती सारी सदृश्य आजाराने ग्रस्त असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, सारीच्या रुग्णांचे स्वॅब नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. अशाच नमुन्यांपैकी पाच जणांचे कोरोना संसर्गाबाबतचे नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आयसीएमआर, डब्लयूएचओच्या गाईडलाईनआयसीएमआर आणि डब्ल्यूएचओनेही सारी आजारासंदर्भात गाईडलाईन अर्थात मार्गदर्शक सुचना दिलेल्या असून सारीच्या रुग्णांचेही स्वॅब नमुने हे प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. या रुग्णांची कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसली तरी त्यांना सारीची लागण झाल्याचे समोर येत आहे. दरम्यान, ताप येणे, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे सारी आजाराची असून त्याचे कोरोना संसर्गाच्या लक्षणाशी साधर्म्य आहे.