लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : रेतीचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीला आळा बसावा, यासाठी प्रशासन सरसावले असून, रेती तस्तकरांना रोखण्यासाठी मोठी मोहीम यंत्रणेने उघडली आहे. त्यानुषंगाने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावरील रेतीसाठय़ाची महसूल यंत्रणा पाहणी करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी बांधकामासाठी रेती खरेदी केली असल्यास रेती वाहतुकीच्या पावत्या आपल्याकडे सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. यापुढे बांधकामाकरिता किंवा इतर कामाकरिता रेतीची आवश्यकता असल्यास रेतीची खरेदी करताना संबंधित वाहनधारकांकडे परिमाणानुसार (ब्रासनुसार) नागरिकांनी वाहतूक पासेसची मागणी करावी, अशा वाहतूक पासेसची प्रत स्वत:जवळ जपून ठेवणे आता नागरिकांना क्रमप्राप्त ठरणार आहे. नागरिकांनी आपल्या बांधकाम स्थळावर रेतीची साठवणूक केली असल्यास त्या रेतीची अथवा वाळूची तपासणी करण्याकरिता महसूल विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी जाणार आहेत. अशी तपासणी होत असताना सदर महसूल यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी यांना संबंधित रेती खरेदीदार नागरिकाने केलेल्या रेतीसाठय़ानुसार वाहतूक पासेस तपासणीकरिता उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे. बांधकामस्थळी साठवूण केलेल्या रेतीचा अथवा वाळूचा साठा वैध नसल्याचे आढळून आल्यास संबंधित रेती खरेदीदारावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील ७३ रेती घाटांचा लिलाव बुलडाणा जिल्ह्यातील ७३ रेती घाटांचा लिलाव करण्यात आला आहे. या रेती घाटातून निर्गतीकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वाहतूक पासेस संबंधित रेती घाटधारकाला देण्यात आल्या आहेत. त्यावर लिलावधारकाचे, परवानाधारकाचे नाव आणि पत्ता, कार्यालयाचा आदेश क्रमांक किती ब्रास रेती आहे, याची सविस्तर माहितीची नोंद आहे.
वाहनाच्या क्षमतेनुसारच वाहतूकवाहनाच्या क्षमतेनुसारच रेतीची त्यातून वाहतूक व्हावी, यासाठी रेतीची वाहतूक करणार्या वाहनांवर वहन क्षमतेप्रमाणे आतील व बाहेरील बाजूस पेंटने परिमाणाची (ब्रासची) निशाणी करण्यात आली आहे. रेतीची वाहतूक करणार्या वाहनधारकांनी त्याप्रमाणेच वाहतूक करावी. संबंधित निशाणी ट्रॉलीच्या चारही बाजूने रेष मारल्याच्या रूपामध्ये असते. त्यानुषंगाने रेतीची खरेदी करताना वाहतूक पासेसची मागणी नागरिकांनी करावी व ती जवळ बाळगावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी केले आहे.