लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : काेराेना संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी शाळा ऑनलाइनच सुरू हाेणार आहेत. दहावी आणि बारावीचे शिक्षक वगळता इतरांना ५० टक्के उपस्थितीची अट ठेवण्यात आली आहे़. याविषयीचे आदेश २५ जून राेजी शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. गेल्या वर्षी काेराेना संसर्ग वाढल्याने शाळा बंदच हाेत्या. यावर्षीही एप्रिल-मेमध्ये काेराेनाची दुसरी लाट आल्याने शाळा बंदच हाेत्या. दरम्यान, शिक्षण विभागाने २७ जूनपर्यंत उन्हाळी सुटी जाहीर केली हाेती. जून महिन्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने शाळा सुरू हाेण्याची अपेक्षा वाढली हाेती. मात्र, शासनाने तिसऱ्या लाटेचा धाेका पाहता तूर्तास शाळा ऑनलाइनच सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. २५ जून राेजी शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेश शाळांना सूचना दिल्या आहेत. वर्ग १ ते ९ व ११वीच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. काेराेना संसर्गामुळे पुढील सूचनेपर्यंत दिशा ॲप व इतर माध्यमांचा वापर करून ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्यात येणार आहे. शाळेत येणाऱ्या पालकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी लागणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेउन वर्षभराचे नियाेजन करावे लागणार आहे. काेविडच्या कामासाठी सेवा अधिग्रहित केलेल्या शिक्षकांव्यतिरिक्त इतर शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. याबाबची जबाबदारी मुख्याध्यापकांवर देण्यात आली आहे़
शिक्षणाधिकारी देणार प्रत्येक शाळेला भेट शाळा सुरू हाेण्याच्या पहिल्याच दिवशी शिक्षणाधिकाऱ्यांचे पथक विविध शाळांना भेटी देणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वच शाळांना ५ जुलैपर्यंत भेट देण्याचे नियाेजन शिक्षण विभागाने केले आहे. या भेटीदरम्यान, शिक्षकांची उपस्थिती, शाळेतील भाैतिक सुविधा व इतर बाबींची पाहणी करण्यात येणार आहे. या पथकात शिक्षणाधिकारी व इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
दहावी, बारावीच्या शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य दहावी, बारावीच्या शिक्षकांना निकालाच्या दृष्टीने १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही शाळेत उपस्थित रहावे लागणार आहे. १० जुलै २०२१ पर्यंत पटनाेंदणी सर्वेक्षणात आढळून आलेल्या विद्यार्थ्यांचे इयत्ता पहिलीत, तर शाळा बाह्य मुलांचे वयानुसार १०० टक्के प्रवेश करावे लागणार आहेत.
शिक्षकांना लस घेण्याचे आवाहन जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांनी शक्य तितक्या लवकर काेराेना लस घ्यावी. काेविड रुग्णांसाठी वापरण्यात आलेल्या वर्गखाेल्यांचे निर्जंतुकीकरण करुन घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शाळेतील भाैतिक सुविधा विशेषत: पिण्याचे पाणी, मुला मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह यांची दुरुस्ती व स्वच्छता करून ते वापरण्यायाेग्य करावी.