- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनाच्या भीतीने खासगी वैद्यकीय सेवेमध्येही लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. सोनोग्राफी सेंटर चालकानीही आपले दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे रुग्णांची धाव आता शासकीय रुग्णालयाकडे सुरू आहे. परंतू शासकीय रुग्णालयांमध्ये सुद्धा सुविधांचा अभाव दिसून येतो. जिल्हा सामान्य रुग्णालयात तर तज्ज्ञ डॉक्टरच सापडत नसल्याचा प्रकार २८ मार्च रोजी ‘लोकमत स्टिंग आॅपरेशनमुळे’ समोर आला आहे.कोरोनाची दहशत सर्वत्र निर्माण झाली आहे. आता वातावरणातील बदलामुळे छोटे-मोठे आजारही डोकेवर काढत आहेत. अगोदरच कोरोनामुळे भयभीत झालेल्यांना आता सर्दी, ताप, खोकला, कान, नाक, घसा दुखणे यासाखे आजारांचाही सामना करावा लागत आहे. वाढत्या आजाराच्या पार्श्वभूमीवर २७ व २८ मार्च रोजी ‘लोकमत स्टिंग आॅपरेशन’ केले असता वैद्यकीय सेवेतील अनेक कच्चे दुवे समोर आले. शहरातील नामांकित खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद केल्याचे दिसून येत आहे. सोबतच कोनोग्राफी सेंटर चालकांनीही सोनोग्राफी केंद्र बंद केले आहे. ज्यांठिकाणी सोनोग्राफी केंद्र सुरू होते, त्याठिकाणी डॉक्टर हजर नव्हते. खासगी दवाखाने सुरू ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही दवाखाने बंद ठेवले जात आहेत. सामान्य रुग्णालयामध्ये तज्ञ डॉक्टरच उपलब्ध होत नाहीत. रुग्णांना वैद्यकीय तज्ञांची प्रतीक्षा करावी लागत आहे; याचा प्रत्यय ‘इएनटी’ विभागामध्ये आला.
असे झाले स्टिंग‘लोकमत’ प्रतिनिधींनी २७ व २८ मार्च रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयासह शहरातील दवाखान्यांची पाहणी केली. यामध्ये शहरातील अनेक दवाखाने बंद दिसून आले. सोनोग्राफी सेंटरही बंद होते. २७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयत रुग्ण म्हणून प्रतिनिधी गेले. त्याठिकाणी बाह्य रुग्ण विभागामध्ये १० रुपयांची पावती घेऊन तपासणीसाठी नोंद केली. तपासणीकरीता ‘इएनटी’ विभागासमोर प्रतिनिधी बसले. परंतू ११ वाजेपर्यंत कान, नाक, घसा तज्ञ आलेच नव्हते. त्यानंतर दुसºया दिवशी २८ मार्चला सकाळी १२.३० वाजता इएनटी विभागाची पाहणी केली असता तज्ञ डॉक्टराच्या रिकाम्या खुर्चीला फॅन हवा घालत असल्याचे दिसून आले.
बाळाच्या आईच्या चेस्टमध्ये गाठ असल्याने त्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी सोनोग्राफी सांगितली. परंतू बुलडाणा शहरातील आठ ते दहा सोनोग्राफी केंद्रावर जाऊन विचारणा केली असता काही केंद्र बंद होते. तर काही ठिकाणी डॉक्टर हजर नव्हते.- प्रकाश चनखोरे, रुग्णाचे नातेवाईक़