वरवट बकाल : तालुक्यात झालेला तूर खरेदी घोटाळा उघडकीस येऊन सहा महिने उलटले. खरेदीचा दुसरा हंगाम सुरू होत आहे. तरी पण तूर घोटाळ्याचा तपासच सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून संथ गतीने सुरू असलेल्या तूर घोटाळ्याचा तपास घोटाळेबाजांची हिंमत वाढवण्यास कारणीभूत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया तालुक्यात उमटत आहेत.तीन महिन्यांपूर्वी तूर घोटाळा उघडकीस येऊन यामध्ये एकूण २0 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. यात ७ व्यापार्यांचा समावेश असून, उर्वरित आरोपी खविसंचे विद्यमान संचालक आहेत. स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर शासनाने तूर घोटाळ्याची चौकशी केली. यातून गंभीर स्वरूपाचे किस्सेदेखील बाहेर आले. यातील आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी खामगाव न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालय तारीख पे तारीख देत आहे. धिम्या गतीने तपास सुरू असल्याचा हा परिणाम असल्याचा आरोप यातील तक्रारकर्ते प्रशांत डिक्कर, संचालक मोहन पाटील यांनी केला आहे. सदर तूर घोटाळ्याचा तपास मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे असून, त्यांनी घोटाळ्यांशी संबंधित सर्व कागदपत्रे खविसंकडून जप्त केल्याची माहिती आहे.असे असताना सदर माहिती न्यायालयात सादर करणे गरजेचे आहे. तरच यातील आरोपींना धडा शिकवला जाऊ शकतो. एक-दोन एकर शेती नावाने असताना शेकडो क्विंटल तूर कशी विकली, ज्यांनी तूरच पेरली नव्हती, त्यांनी तूर विकली. काहींनी तूर न विकताही खविसंतून धनादेश नेले अशा गंभीर बाबी चौकशीतून समोर आल्या आहेत.ही शासन व जनतेची फसवणूक नाही काय, असा सवाल शेतकरी करीत आहेत. शासनाने नाफेड अंतर्गत तूर खरेदी योजना राबविली; पण या योजनेचा खरा मलिदा व्यापार्यांनीच लाटला. ही सर्व वस्तुस्थिती असताना तपास अधिकारी मात्र चौकशीच्या नावाखाली कारवाई पुढे-पुढे ढकलत आहेत. या घोटाळ्यामुळेच खविसंचे संचालक मंडळ बरखास्त करावे, असे शासनाचे निर्देश असतानाही सहकार अधिकारी श्रेणी-१ कारवाई करीत नसल्याचा आरोप होत आहे.
नवीन हंगाम येऊन ठेपला तरी कारवाई नाहीतूर खरेदीचा दुसरा हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर आहे; पण मागील हंगामातील घोटाळ्याचा तपास अजून पूर्ण नाही. आरोपींना जमानतींकरिता वेळ दिला जात असून, जनतेचे लक्ष या कारवाईकडे लागलेले आहे.