बुलडाणा : कोरोना नावाच्या अदृश्य विषाणूने आपणाला चिंताक्रांत बनविले होते. या विषाणूचा संसर्ग थोपविण्यासाठी राज्य शासनाने प्रशासनासोबत घेत विविध उपाययोजना राबविल्या. परिणामी कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यात शासनाला यश आले. कोरोना विषाणूवर कायमस्वरूपी मात करीत जिल्ह्याला सर्वांगसुंदर जिल्हा बनविणार, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताकाचा ७१ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधित करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार श्वेताताई महाले, जि.प अध्यक्षा मनिषा पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवत, माजी आमदार सर्वश्री विजयराज शिंदे, राहुल बोंद्रे, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते आदींसह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक यांची उपस्थिती होती.
कोरोनावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जिल्ह्यात आठवड्यातून पाच दिवस दहा केंद्रावर लसीकरण सुरू असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने कोविड लस दिल्या जात आहे. आतापर्यंत २५०० लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. मागील काळात राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत राज्य शासनाने रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्ताचा तुटवडा भविष्यात निर्माण न होण्यासाठी प्रत्येकाने रक्तदान करण्याचे आवाहनही पालकमंत्री यांनी केले.
जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, अशा हवालदिल परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आर्थिक मदत जाहीर केली. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात प्राप्त निधीपैकी १ लक्ष ८ हजार ५०३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४८ कोटी ५० लक्ष रुपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त नव्हे, तर चिंतामुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात १ लक्ष ६९ हजार ५९६ लाभार्थी शेतकऱ्यांना ११२१ कोटी रुपये त्यांच्या थेट कर्ज खात्यात जमा करण्यात आले आहे. शिवभोजन थाळी योजनेंतर्गत जिल्ह्यात १७ केंद्रांमधून ५ लक्ष ४१ हजार १६९ लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले.