लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: भाजपमध्ये सध्या संघटनात्मक बदलांचे वारे सुरू असून वर्तमान स्थितीत मंडल अध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे ३० डिसेंबर रोजी प्रत्यक्षात भाजप जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे. त्यामुळे या निवडीकडे सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातदादा पाटील यांनी नागपूर येथे झालेल्या बैठकीत अंतर्गत निवडणुकांचा कार्यक्रम वेगाने पुर्णत्वास नेण्याबाबात सुचीत केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपमध्ये संघटनात्मक बदलांच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जिल्ह्यातील या निवडणूक प्रक्रियेने वेग घेतला आहे. मात्र सध्या जिल्हाध्यक्ष निवडीचीच चर्चा सुरू आहे. मात्र वास्तविक भाजपमध्ये संघटनात्मक निवडणुकांमध्ये आता प्रथमत: २० मंडल अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. या निवडीनंतर ३० डिसेंबर रोजी प्रत्यक्षात जिल्हाध्यक्षाची निवड होईल. वर्तमान स्थितीत भाजपचे जिल्हाध्यक्ष हे धृपदराव सावळे हे आहेत. त्यांच्या कार्याकाळातही पक्षाने जिल्ह्यात चांगली कामगिरी केली आहे. जिल्हा परिषद निवडणूक, लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील रिझल्ट हे बालके आहेत.नागपूर येथे गेल्या दोन दिवसापूर्वी भाजपच्या झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पक्षांतर्गत पातळीवरील, जिल्हास्तरावरील, मंडळस्तरावरील पदाधिकारी निवडीची प्रक्रिया त्वरेने पूर्ण करण्याबाबात निर्देश दिले आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील भाजपमध्येही संघटनात्मक बदलांचे वारे वेगाने वाहत आहेत. साधारणत: बुथ कमिट्यांच्या माध्यमातून मंडळ अध्यक्ष अर्थात तालुका अध्यक्ष निवडले जातात. बुथ कमिटीमधील सक्रीय सदस्य प्रथमत: तालुकाध्यक्ष अर्थात मंडलअध्यक्ष निवडतील. दरम्यान, या निवडणुकीकडे सध्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कोअर कमेटी करेल अध्यक्षाची निवडभाजपच्या जिल्हाध्यक्षाची निवड करताना कोअर कमिटीची भूमिका महत्त्वाची असते. जिल्हास्तरीय या कोअर कमिटीमध्ये दहा सदस्य असून वर्तमान जिल्हाध्यक्षांसह चार महामंत्री आणि काही सदस्य असतात. संघटन महामंत्री मोहन शर्मा, नंदकिशोर अग्रवाल, संजय बापू देशमुख यांच्यासह अन्य सदस्यांची मिळून ही कोअर कमेटी बनते. या कोअर कमेटीमध्येच जिल्हाध्यक्षाची निवड होऊन ते नाव मान्यतेसाठी भाजप प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात येते. तेथून हिरवी झेंडी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात भाजप जिल्हाध्यक्षाचा पदभावर नवीन व्यक्ती स्वीकारते. सध्या या शर्यतीत पाच जणांची नावे असली तरी प्रत्यक्षात कोअर कमिटीमध्ये काय निर्णय होतो त्यावर बाकी गणिते अवलंबून आहेत.