बुलढाणा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मनिषा पवार (काँग्रेस) या अध्यक्षपदी विराजमान झाले असून उपाध्यक्षपदी कमल बुधवत (शिवसेना) यांची निवड झाली आहे. प्रतिस्पर्धी भाजपकडून अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आलेले दोन्ही अर्ज मागे घेण्यात आल्यामुळे महाविकास आघाडीच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची अविरोध निवड झाली आहे.बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेस तर्फे जानेफळ जिल्हा परिषद गटातील मनिषा पवार यांनी तर शिवसेनेतर्फे कमल बुधवत यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. भाजपतर्फे अध्यक्षपदासाठी जामोद जिल्हा परिषद गटातील रुपाली अशोक काळपांडे यांचा तर उपाध्यक्षपदासाठी जयश्री विनोद टिकार यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. दुपारी दोघांनीही अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणुक अविरोध झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेचे पिठासीन अध्यक्ष म्हणून बुलडाण्याचे उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांनी काम पाहिले.महाविकास आघाडी मिनी मंत्रालयात भाजपला सत्तेतून खाली खेचण्याच्या इराद्याने या निवडणुकीत उतरली होती. भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजप प्रारंभीच बॅकफुटवर गेलेली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे १४, शिवसेनेचे ११ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ सदस्य असून भारीप-बमसचाही पाठींबा महाविकास आघाडीला आहे.
बुलडाणा जिल्हा परिषद : अध्यक्ष, उपाध्यक्षपद महाविकास आघाडीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 2:35 PM